तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा-नावीन्य आणण्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका या खासगी बँकांच्या तुलनेत मागासलेल्या आहेत. या धारणेला खोटे ठरविणारी कामगिरी भारतीय स्टेट बँकेने केली आहे. देशांत सर्वाधिक मोबाइल बँकिंग व्यवहारांची नोंद स्टेट बँकेच्या मंचावर करण्यात आली असल्याचे ताजी आकडेवारी स्पष्ट करते.
जानेवारी-डिसेंबर २०१३ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी-डिसेंबर २०१४ या वर्षभराच्या कालावधीत स्टेट बँकेच्या मोबाइल बँकिंग व्यवहारात तब्बल ४६ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत बँकेच्या १.२५ कोटी ग्राहकांनी बँकेच्या मोबाइल बँकिंग मंचाचा वापर करून हे व्यवहार केले आहेत. ३० सप्टेंबर २०१४ रोजी देशांत एकूण मोबाइलधारकांची संख्या ९५.७७ कोटी होती. चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकाची ही मोबाइलधारकांची संख्या आहे. मागील वर्षांत स्टेट बँकेच्या ८५.७८ लाख ग्राहकांनी मोबाइल बँकिंग प्रकारात नोंदणी केली होती. डिसेंबर २०१४ मध्ये बँकेच्या मोबाइल बँकिंग मंचावर नोंदलेल्या ग्राहकांची संख्या १.२५ कोटी गेली आहे.
देशातील पहिल्या क्रमांकाची बँक असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात स्टेट बँकेचे ग्राहक पसरलेले आहेत. गेल्या वर्षभरात नवीन उघडलेल्या खातेधारकांपकी ७० टक्के खातेधारक हे चार बडय़ा महानगरांबाहेर वास्तव्य करणारे आहेत. स्टेट बँकेची मोबाइल बँकिंग सेवा ही वापरण्यास सुलभ असल्याने कोणीही या सेवेसाठी नोंदणी करू शकतो.
स्टेट बँकेने ‘एसबीआय एनीव्हेअर बँकिग’ हे स्मार्ट फोन अ‍ॅप विकसित केले असून अन्य प्रकारच्या फोनचा वापर करून बँकिंग व्यवहार करण्यासाठी ‘स्टेट बँक फ्रीडम’ या सेवेचा उपयोग करता येतो. ज्या  वेळेला पेमेंट बँका अस्तित्वात येतील तेव्हा या बँकांच्या व्यवसाय विस्तारात मोबाइल बँकिग हा महत्त्वाचा पैलू ठरणार आहे.

**स्टेट बँकने जास्तीत जास्त ग्राहकांनी आपल्या बँकिंग गरजासाठी पारंपरिक पद्धतीने शाखेत जाण्याऐवजी इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग अशा आधुनिक मंचांचा वापर करावा यासाठी प्रोत्साहित केले आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा गर-शाखा पद्धतीच्या बँकिग व्यवहारावर स्टेट बँकेचा भर आहे.’’
** बी. श्रीराम
राष्ट्रीय बँकिंग व्यवसाय प्रमुख व व्यवस्थापकीय संचालक, भारतीय स्टेट बँक