स्टेट बँकेचा नफाही तिमाहीत दुपटीवर

मार्च २०१७ अखेरच्या तिमाहीत दुप्पट नफ्यातील वाढ राखणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा बँकेला वाढत्या बुडीत कर्जाबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. स्टेट बँकेचे जानेवारी ते मार्च २०१७ मधील निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६.९ टक्क्यांवरून यंदा ६.५ टक्के झाले आहे.

एकूण वितरित कर्जाच्या तुलनेतील हे प्रमाण एकटय़ा स्टेट बँकेचे आहे. प्रमुख बँकेत पाच सहयोगी व एक महिला बँकेचे विलीनीकरण एप्रिल २०१७ पासून अस्तित्वात आले आहे.

मात्र स्टेट बँक समूहाच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाणात गेल्या तिमाहीत थेट ९.०४ टक्क्यांपर्यंत तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाणात ५.१५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान हे प्रमाण अनुक्रमे ६.४० व ३.७३ टक्के होते.

बँक समूहाने गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत मात्र निव्वळ नफा दुप्पट २,८१४.८२ कोटी रुपये नोंदविला आहे. वर्षभरापूर्वी तो १,२६३.८१ कोटी रुपये होता. तर केवळ स्टेट बँकेचा परिचलन नफा १२.९३ टक्क्यांनी वाढला आहे. निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न १७.३३ टक्क्यांनी वाढले आहे.

भांडवली बाजाराच्या व्यवहारादरम्यान दुप्पट नफ्याचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या स्टेट बँकेचा समभाग सत्रअखेर १.७२ टक्क्यांनी वाढला. बँक समभाग सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात ३०८.१५ रुपयांवर स्थिरावला.