बँकिंग क्षेत्रातील अग्रणी भारतीय स्टेट बँकेने आपल्या ठेवींवरील व्याजदराची फेररचना करताना, एक ते तीन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर पाव टक्क्यांनी कमी केले आहेत. गुरुवार, १८ सप्टेंबरपासून या मुदतीच्या ठेवींवर आता ८.७५ टक्के व्याजदर लागू होईल. बहुतांश बँकांकडून अशा मुदत ठेवींसाठी सध्या ९ टक्क्यांच्या घरात व्याजदर दिला जात असून, स्टेट बँकेने टाकलेल्या पावलाचे अनुकरण करताना त्याही व्याजदरात कपात करतील अशी शक्यता दिसून येत आहे.
मंदावलेल्या कर्ज वितरणाच्या परिणामी स्टेट बँकेने मध्यम मुदतीच्या ठेवींवर व्याजदरात कपात केली असली तरी १८०-२१० दिवसांच्या अल्पमुदत ठेवींवर व्याजाचे दर पाव टक्क्यांनी वाढवून ते वार्षिक ७.२५ टक्क्यांवर नेले आहेत. ऑगस्ट महिन्यांतील ग्राहक किमतीवर आधारित महागाई दर ७.८० टक्क्यांवर घसरले असून, बँकेच्या ठेवीदारांना चलनवाढीचा दर वजा जाता सकारात्मक परतावा लाभेल याची या व्याजदर कपातीतून काळजी घेतली गेली असल्याचे बँकेने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
मे २०१३ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने कर्जावरील व्याजाचे दर वाढतील अशा रीतीने रेपो दरात तीन वेळा केलेल्या वाढीने पाऊण टक्क्यांची भर घातली आहे. त्याच वेळी वर्षभरात बँकांनी विविध मुदतीच्या ठेवींवरील दिल्या जाणाऱ्या व्याजात ०.३ टक्क्यांची भर घातली आहे. तथापि सरलेल्या तिमाहीत देशाच्या बँकिंग प्रणालीतील कर्ज वितरण हे १०.९ टक्के दराने म्हणजे अलीकडच्या काळात सर्वात धीम्या गतीने वाढले आहे. २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ ही अनुक्रमे १३-१४ टक्के आणि १७-२० टक्क्यांच्या घरात होती. बँकांकडे सध्या पुरेशी द्रवता असताना, ठेवींच्या कपातीनेही त्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे मत बँकिंग वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
कर्जदारांसाठी मात्र सुवार्ता!
घर-गाडीसाठी बँकेकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य कर्जदारांना बऱ्याच काळानंतर आनंदाचे क्षण लाभले आहेत. घरासाठी कर्ज देणाऱ्या स्टेट बँक आणि एचडीएफसी यांनी व्याजाचे दर अलीकडेच कमी केले आहेत. स्टेट बँकेचे गृहकर्ज आता महिला ग्राहकांसाठी १०.१० टक्के तर पुरुष ग्राहकांसाठी १०.१५ टक्के लागू झाले आहेत. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेनेही मर्यादित कालावधीसाठी १०.१० टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध केले आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने विविध ग्राहक कर्जावरील व्याजाचे दर खाली आणताना, त्यासाठी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे.

बँकेची द्रवतेची स्थिती उत्तम आहे आणि उद्योग क्षेत्रातून कर्ज मागणीही नजीकच्या काळात लक्षणीय वाढेल अशी स्थिती नाही. त्यामुळे ठेव म्हणून गोळा केलेल्या निधीचा फायदा मिळवून कर्ज व्यवहारासाठी विनियोग होत नसेल तर अशा ठेवींसाठी अधिक खर्चात पडणे निर्थकच आहे.
– के. आर. कामथ, पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक