दुपटीने वाढलेल्या ‘एनपीए तरतुदी’चा भार
देशातील अनेक सार्वजनिक बँकांचा तोटा विस्तारत असताना स्टेट बँकेने नफ्याची कामगिरी कायम राहिली आहे. मात्र वाढते अनुत्पादित कर्ज आणि त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद याचे ओझे सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेलाही चुकले नाही.
मार्च २०१६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने १,२६४ कोटी रुपयांचा नफा कमाविला असून त्यातील घसरण ही वार्षिक तुलनेत ६६ टक्के आहे. तर बुडीत कर्जाकरिता करावी लागणारी आर्थिक तरतूद वर्षभरापूर्वीच्या ४,९८५.८३ कोटी रुपयांवरून १२,१३९.१७ कोटी रुपयांवर गेली आहे.
बँकेच्या बुडीत कर्ज रकमेत जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीत ३०,००० कोटी रुपयांची भर पडल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी निकाल जाहीर करताना दिली. यामध्ये लघु व मध्यम उद्योगांच्या थकीत कर्जाची रक्कम तुलनेत अवघी १,००० कोटी रुपये असून मोठय़ा कंपन्या व उद्योग समूहांच्या कर्ज खात्यांवर बँकेचे यापुढे बारीक लक्ष असेल, असेही त्या म्हणाल्या.
बँकेचा नफा निम्म्यावर आला असून उत्पन्न वर्षभरापूर्वीच्या ५३,५२६.९७ कोटी रुपयांवरून गेल्या तिमाहीत ४८,६१६.४१ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. मालमत्ता गुणवत्ता आढावा ९,००० कोटी रुपयांपर्यंत विस्तारण्यात आल्यामुळे नफ्यातील घसरण नोंदली गेल्याचे बँकप्रमुखांनी स्पष्ट केले.
बँकेने २०१५-१६ या संपूर्ण आर्थिक वर्षांत ९,९५०.६५ (-२४%) कोटी रुपये नफा नोंदविला आहे. तर उत्पन्न मात्र या कालावधीत १.७४ लाख कोटी रुपयांवरून १.९१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. बँकेच्या गेल्या आर्थिक वर्षांतील अनुत्पादित मालमत्तेचे एकूण कर्जाच्या तुलनेतील प्रमाण वाढत ३.८१ टक्क्यांवर गेले आहे.
कॅनरा, सेंट्रल बँकेला मोठा तोटा
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे.
कॅनरा बँकेने जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान ३,९०५.४९ कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. बँकेने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ६१२.९६ कोटींचा नफा राखला होता. बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण यंदा तिपटीने वाढून ते ९.४० टक्के झाले आहे. तर त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद १५ टक्के अधिक आहे. बँकेने कोणताही लाभांश देऊ केला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियानेही जानेवारी ते मार्च २०१५ मधील ६६६.०६ कोटींच्या नफ्यावरून यंदाच्या तिमाहीत १,३९६.३७ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे गेली आहे. बँकेचे अनुत्पादित कर्ज प्रमाण ११.९५ टक्क्यांवर गेले आहे. तर बुडित कर्जासाठीची बँकेची यंदाची एकरकमी तरतूद ही ५७०.९५ कोटी रुपये आहे.