ब्रेग्झिटच्या पाश्र्वभूमीवर मध्यवर्ती बँकांना इशारा

ब्रिटनने युरोपीय संघापासून काडीमोड घेतल्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी चलनाचे स्वत:हून अवमूल्यन करून निर्यात व्यापार वाढविण्याची चढाओढ टाळली जायला हवी. तसे घडले तर ते जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ठरेल, असा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला.

अस्थिरतेच्या स्थितीत चलनाचे विनिमय मूल्य वर-खाली होणे अपरिहार्य आहे. परंतु चलनाने एका विशिष्ट दिशेने सरकत जावे, जेणेकरून चालू स्थितीत स्पर्धात्मक फायदा मिळविता येईल, या स्वरूपाचा चलन बाजारात हस्तक्षेप होत असल्यास ती चिंतेची बाब ठरेल, असे स्वित्र्झलडमधील बॅसल येथे आंतरराष्ट्रीय बँकर्स परिषदेसाठी गेलेले राजन यांनी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र डॉलरच्या तुलनेत पौंडात विक्रमी घसरणीसाठी ब्रिटनने हे काडीमोडापर्यंत गेलेले सार्वमत घडवून आणले असे आपण म्हणत नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. राजन यांनी यापूर्वीही चलन अवमूल्यनाच्या जागतिक चढाओढीला नाकारणारी जाहीर टीकाटिप्पणी केली आहे.

ब्रेग्झिटच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेतील संभाव्य अनियमिततांना तोंड देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करतानाच तरलता वाढवली जाईल, असे राजन यांनी शुक्रवारी सकाळी रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले. प्रारंभिक चिंतेच्या वातावरण शमल्यानंतर भारतात गुंतवणूक परत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला आहे. डॉलरची तरलता व रुपयाची तरलता या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतापुढे पेचाची स्थिती नाही!

गुंतवणूक बाहेर जाण्याच्या भीतीबाबत त्यांनी सांगितले की, इतर अर्थव्यवस्थांपेक्षा आपली अर्थव्यवस्था ठोस आर्थिक घटकांवर उभी आहे त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात तसे होईल असे नाही. जीएसटीबाबत उपाययोजनांना सरकार वचनबद्ध आहे तोपर्यंत गुंतवणूकदार दुसरीकडे जाणार नाहीत. अनिश्चिततेच्या वातावरणात एक बाजारपेठ दुसरीवर परिणाम करीत असते. त्यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक आहे, आतापर्यंत तरी बाह्य़ घटकांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर पेच निर्माण करणारा परिणाम झालेला नाही.

प्रारंभिक धक्क्यानंतर लोक पुन्हा सुरक्षित बाजारपेठांचा गुंतवणुकीसाठी शोध घेतील. त्यामुळे आता जात असल्याचे दिसणारी गुंतवणूक भारतात परत येईल. या परिस्थितीतही इतर चलनांच्या तुलनेत रुपयावर फार परिणाम झालेला नाही. मेक्सिकोचा पेसो व ब्रिटनच्या पौंडवर झालेला परिणाम ६-७ टक्क्यांचा हादरा देणारा आहे, तसा भारतात झालेला नाही. ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया दोन वर्षे चालणार आहे त्यामुळे अस्थिरता किती काळ चालेल सांगता येत नाही व लगेच मोठे परिणाम होतील असेही नाही.

आजच्या परिस्थितीतही इतर चलनांच्या तुलनेत रुपयावर फार परिणाम झालेला नाही. मेक्सिकोचा पेसो व ब्रिटनच्या पौंडवर झालेला परिणाम ६-७ टक्क्यांचा हादरा देणारा आहे, तसा भारतात झालेला नाही.

– रघुराम राजन, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक