सोशल मीडिया असो की मैदानाचा कट्टा असो, की दूरचित्रवाणी असो की वृत्तपत्रे असोत- ‘अब की बार’ यत्रतत्र सर्वत्र दिसून येते. नरेंद्र मोदींचे विरोधक काहीही म्हणोत, पण मोदींनी जनमानस ढवळून काढले आहे. आपला शेअर बाजारदेखील याला अपवाद कसा राहील? निर्देशांकांनी नवनवीन उच्चांक करण्याचा सपाटा लावला असताना बाजारावर भाष्य करताना बाजारातील जाणकार मोदीमय झाले आहेत. १६ मे ला भाजप २५० जागा घेणार की २७५, की ३००, यावर अंदाज वर्तवण्याची स्पर्धा चालू आहे. मोदींचा राज्याभिषेक झाल्यावर किती दिवसांत शेअर निर्देशांक २५००० पातळी ओलांडणार यावर पैजा मारणारे अनेकजण दिसून येतात. अशा वातावरणात बाजारातील भोंदू मंडळींचे फावले नाही तरच नवल. ‘मोदी इफेक्ट’मुळे कोणते शेअर वर जातील ते जाणण्यासाठी आमची रिसर्च सव्र्हिस विकत घ्या, सत्तेवर कोणीही आले तरी किमान ९०% नफा देणारी आमची स्ट्रॅटेजी जाणून घेण्यासाठी आमची सेवा विकत घ्या. ९५% सक्सेस रेशो असणारी रिसर्च सेवा एक महिन्याकरता फक्त १०,००० रुपयांत.. या व अशा प्रकारचे अनेक दावे करणारे एसएमएस व ई-मेल हल्ली फिरत आहेत. सध्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकांसंबंधी विचारणा करणाऱ्या मंडळींच्या ई-मेलची संख्यादेखील वाढली आहे. अमुक तमुक रिसर्च सव्र्हिस किंवा न्यूज लेटरच्या पोर्टफोलियोमध्ये गेल्या तीन महिन्यांत ७०% वाढ झाली आहे, तर मी ती टिप्स सव्र्हिस घेऊ का? किंवा १०,००० रुपयांत अमुक तमुक न्यूज लेटर घेऊ का? अशा विचारणा ई-मेलवर करणाऱ्या मंडळींना समाधानकारक उत्तर देणे मला फारच कठीण वाटते.
गेल्या तीन वर्षांत शेअर बाजारात फारसे काही झाले नाही. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार बाजारापासून लांब गेला आणि आता बाजाराने अचानक उसळी मारली. त्यामुळे पैसे कमावण्याची संधी हुकलेला हा सामान्य गुंतवणूकदार अशा एखाद्या आमिषाला बळी पडू शकतो. पण अशा आमिषांपासून दूर राहण्यात शहाणपणा आहे, हे वेगळे सांगायला नको. खरे तर शेअर बाजारात १००% यश देणारी अशी कोणतीही स्ट्रॅटेजी नसावी. किमानपक्षी मला तरी माहिती नाही. शेअर बाजारात हयात घालवलेल्या आणि चांगले पैसे कमावणाऱ्या व्यक्ती ‘दीर्घ मुदतीत १० पैकी ७ अंदाज (७०%) बरोबर आले तरी डोक्यावरून पाणी’ असे म्हणतात. एखाद्या वेळी एखाद्या तज्ज्ञाने वर्तविलेले १० पैकी १० अंदाज खरे ठरतात, पण हे नेहमीच होते, असे नाही. वर्षांनुवर्षे १००% यशस्वी अंदाज बांधण्याचा दावा करणारी व्यक्ती एकतर खोटारडी असेल किंवा परमेश्वर असेल. कोणतीही जोखीम न घेता झटपट पैसे कमावता येत नाहीत आणि कुणाला येत असतील तर त्याने झटपट पैसे कमावण्याची ती युक्ती स्वत: पुरती वापरावी. काही हजार रुपये घेऊन किंवा पोर्टफोलियोच्या २ ते ५% इतकी वार्षिक फी घेऊन इतरांना का सांगावी? प्रचंड नफा कमावून देण्याचे दावे करणाऱ्या व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या यादीत असायला हव्यात. त्या प्रत्यक्षात तिथे का नसतात याची उत्तरे आपण शोधायला हवीत. खरे तर ती उत्तरे शोधायची गरज नाही. त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडणे व अशा व्यक्तींना अनुल्लेखाने मारणे यातच सर्व काही आले.
पण सर्वच रिसर्च सव्र्हिस किंवा न्यूज लेटर काही वाईट नाहीत. मग नीरक्षीरविवेक दाखवणे आलेच. आज अशा सेवा देणाऱ्या मंडळींची सेबीसारख्या बाजार नियंत्रकांनी किंवा इतर कुणी मान्यवर संस्थेने तयार केलेली अद्ययावत सूची उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांना बऱ्याचदा अंधारात बाण मारण्यावाचून पर्याय राहत नाही. आता या क्षेत्रातील भल्याबुऱ्या मंडळींची काही व्यवच्छेदक लक्षणेदेखील बघू. या क्षेत्रातील खरी तज्ज्ञ मंडळी यशाची, नफ्याची कोणतीही खात्री देत नाहीत. त्यांच्या सेवांच्या जाहिराती करताना त्यांच्या यशस्वी गुंतवणुकांबद्दल बोलतानाच त्यांच्या चुकाही सांगतात. ग्राहकांना त्यांच्या सेवांमध्ये काय मिळेल, हे सांगताना काय मिळणार नाही, हेदेखील सांगतात. उदाहरणार्थ, काही सेवा प्रदाता इे-मेलवर गुंतवणूक संधीचे एक न्यूज लेटर पाठवून देतात. त्यापलीकडे वाचकाला काहीही मिळत नाही. तसेच न्यूज लेटरमध्ये चर्चिलेल्या एखाद्या गुंतवणूक संधीसंबंधी अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर ई-मेल हेच एक माध्यम असेल, असे सांगताना ग्राहकाला कुणाही एका व्यक्तीबरोबर ‘बोलण्याची’ संधी मिळणार नाही, हे अध्याहृत असते.
ट्रेडिंग टिप्स देणारा तुमच्यासाठी ‘ट्रेड’ करत नाही. ट्रेडरने स्वत: ट्रेड करणे अपेक्षित असते. थोडक्यात सांगायचे तर एकदा पैसे भरून रिसर्च सव्र्हिस घेतली की झालो आपण श्रीमंत, असे होत नाही. त्यामुळे जर शेअर बाजारात नवीन असाल किंवा शेअर बाजारातील तांत्रिक (ऑपरेशनल) खाचखळगे कळत नसतील तर अशा सेवांच्या वाटय़ाला जाऊ नका. एखादी व्यक्ती आम्ही नुसत्या ट्रेडिंग टिप्स न देता तुमच्या खात्यामध्ये ट्रेडदेखील करून देतो, अशी सर्वसमावेशक सेवा देऊ करते. अशी सेवा केवळ सेबी प्रमाणित पोर्टफोलियो मॅनेजर देऊ शकतात. अशी सेवा देऊ करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांची जंत्री सेबीच्या वेबसाइटवर मिळते. जी मंडळी सेबी प्रमाणित नसतील त्यांच्याकडे तुमच्या खात्याचे नियंत्रण देणे धोक्याचे आहे. आता पुन्हा टिप्स सव्र्हिसकडे वळू या.
जरी ट्रेडिंगचा अनुभव असला तरी किती ट्रेडिंग टिप्स मिळणार हेदेखील महत्त्वाचे आहे. विशेषत: डेरिवेटिव्ह ट्रेडिंग करताना हे फार महत्त्वाचे असते. एक निफ्टी फ्युचर विकत घेतले तर रु. २७,००० इतकी मार्जीन भरावी लागेल. तो ट्रेड चालू असताना बँक निफ्टी शोर्ट केला तर आणखी रु २६,००० इतकी मार्जीन भरावी लागेल. जेवढय़ा पोझिशन बाजारात घ्याल तेवढे भांडवल अडकेल. तसेच मी केवळ जमेल तेवढय़ाच टिप्सवर ट्रेड करेन, असे म्हणता येणार नाही. टिप्स देणाऱ्या व्यक्तीने एका महिन्यात १० ट्रेड टिप्स दिल्या तर सर्व १० टिप्सवर तुम्ही ट्रेड करणे अपेक्षित आहे. एखाद्या महिन्यात १० पैकी ८ ट्रेड टिप्स फायद्यात असल्या आणि फक्त २ मध्ये नुकसान झाले तर टिप्स देणारा ८०% हिट रेट म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेईल. पण त्या महिन्यात मी केवळ २ ट्रेड केले आणि नेमके त्याच दोन्ही ट्रेडमध्ये नुकसान झाले तर मला त्या ८०% हिट रेटचा काय फायदा? एखाद्या वेळी १० ट्रेड चालू असतील आणि प्रत्येक ट्रेडवर रु. २५००० गुंतत असतील तर माझ्याकडे किमान रु. २५०००० असायला हवेत. शिवाय टिप्स देणाऱ्या व्यक्तीचा एखादा महिना वाईट गेला आणि बहुतांश ट्रेड टिप्स नुकसानीत गेल्या तर पुढील महिन्यात ते नुकसान ट्रेडिंगमधून भरून काढायला परत भांडवल असायला हवेच. थोडक्यात सांगायचे तर ज्यांच्याजवळ वेळ, पैसा, शिस्त, प्रचंड पैसे कमावण्याची इच्छा आणि सर्व पैसे गमावण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी या टिप्स सेवा आहेत. तुम्ही या वर्गात मोडत नसाल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वत: अभ्यास करून शेअर बाजारात पैसे गुंतवा किंवा म्युच्युअल फंडासारख्या सुनियंत्रित आणि पारदर्शक माध्यमाचा वापर करा.