सलग दुसऱ्या सप्ताहात निर्देशांकांची नकारात्मक कामगिरी
शुक्रवारी उशिरा जाहीर येणाऱ्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर विषयक कौलावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्टेंबरच्या नवीन वायदापूर्ती मालिकेतील व्यवहारांना सावध सुरुवात केली. ५३.६६ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७८२.२५ वर थांबला. तर निफ्टीत १९.६५ अंश घसरण नोंदली गेल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,५७२.५५ पर्यंत आला.
साप्ताहिक तुलनेत मुंबई निर्देशांक २९४.७५ अंशांनी, तर निफ्टी ९४.३५ अंशांनी घसरला आहे. टक्केवारीत ही घट एक टक्क्याहून अधिक आहे. निर्देशांकांसाठी सलग दुसरा सप्ताह नकारात्मक कामगिरीसह नोंदविला आहे. शुक्रवारी महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांचे पहिले सत्र होते.
संभाव्य व्याजदर वाढ सुचविणारे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हची बैठक भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी उशिरा होत आहे. त्याचे अपेक्षित सावट बाजारात शुक्रवारच्या व्यवहारात उमटले. गेल्या दोन व्यवहारांपासून घसरत असलेल्या सेन्सेक्सने सप्ताहअखेरच्या व्यवहाराची सुरुवात तेजीसह केली होती. मात्र याच दरम्यान तो २७,६९६.९९ या दिवसाच्या तळातही पोहोचला.
गेल्या चार दिवसांपासून सातत्याने घसरत असलेला वेलस्पन इंडियाच्या समभागाने शुक्रवारच्या सत्रात काही कालावधीकरिता तेजीचा अनुभव घेतला. मात्र व्यवहाराच्या शेवटी तो ८.६४ टक्क्यांनी घसरत ४९.७० रुपयांवर स्थिरावला. या चार सत्रांत समभागाचे मूल्य तब्बल ४७ टक्क्यांनी आपटले आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ५,३३९.५२ कोटी रुपयांनी खाली कमी झाले आहे.
चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील नफ्यातील ५७ टक्के घसरण नोंदवूनही टाटा मोटर्सचा समभाग मात्र गुरुवारच्या तुलनेत २.०१ टक्क्यांनी वाढून ५०३.६५ रुपयांवर गेला.
सेन्सेक्समधील १७ समभागांचे मूल्य रोडावले. यामध्ये विप्रो, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, स्टेट बँक, सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, ल्युपिन यांचा त्यात समावेश राहिला, तर मागणी असलेल्या समभागांमध्ये गेल, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला आदी राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक १.२५ टक्क्यांसह घसरला. सोबतच भांडवली वस्तू, स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा, बँक, ऊर्जा आदी १.२४ टक्क्यांपर्यंत खाली आले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांत संमिश्र हालचाल नोंदली गेली. मिड कॅप ०.१७ टक्क्यांनी उंचावला, तर स्मॉल कॅप ०.१२ टक्क्यांनी घसरला.