पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वचनांच्या पूर्ततेची त्यांना पुरेशी संधी द्यायलाच हवी.. इतक्यात हताश होऊ नका, मोदींच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी येथे केले. काही उद्योगधुरीणांनी अलीकडेच  ‘देशात मोदी सरकार आल्यानंतर काहीच बदल घडलेला नाही’ अशा व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीला टाटा यांनी हे उत्तर दिले.
मोदी सरकारने सत्तेवर येऊन वर्षही पूर्ण केलेले नाही, असे नमूद करीत टाटा म्हणाले, ‘‘हे नवीन सरकार आहे, हे सर्वानी ध्यानात घ्यावे. आपण इतक्या लवकर हताश आणि असमाधानी होण्याची गरज नाही.’’ मुंबई इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस बोकोनी या संस्थेच्या दीक्षान्त समारंभाचे अतिथी म्हणून ते बोलत होते.
एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, मॅरिको समूहाचे हर्ष मारिवाला आणि सीआयआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनीही नव्या सरकारच्या आर्थिक सुधारणांचे वास्तवात प्रतिबिंब उमटलेले अद्याप दिसून आलेले नाही, अशा नाराजीवजा व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता, टाटा यांना नव्या राजवटीतील अर्थकारणाबाबत मत विचारणारा प्रश्न करण्यात आला होता.
त्यावर ते म्हणाले, ‘‘मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्त्वाबद्दल प्रचंड आशा आहेत. त्यांना अपेक्षित असलेला नवीन भारत साकारण्याच्या प्रयत्नांतील ही केवळ सुरूवात आहे. अगदी या वर्षांपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार नाही. दिलेली वचने राबविण्यास त्यांना पुरेशी संधी द्यायलाच हवी.’’
मोदी यांनी कल्पिलेल्या वाटेने देश पुढे जाण्याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे, असे टाटा यांनी सांगितले.