१९९३ पासून करण्यात आलेले २१४ खाणींचे वाटप रद्दबातल ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भांडवली बाजाराला बुधवारी कमालीचे अस्वस्थ केले. शेअर बाजाराच सेन्सेक्स दिवसअखेर अवघ्या ३१ अंशांनी घसरलेला. दिसत असला तरी न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळी २१५ अंशांनी कोसळून त्याने धास्तीचा प्रत्यय दिला.
कोळसा खाणवाटपाबाबतचा यापूर्वी राखून ठेवण्यात आलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दुपारी जारी केला. यानुसार २१८ पैकी २१४ खाणींचे वाटप रद्द करण्याचे आदेश दिले गेले. यानंतर सेन्सेक्समध्ये २१५ अंशांपर्यंतची घसरण नोंदली गेली. याच वेळी सेन्सेक्स २६,५६० या दिवसाच्या नीचांकावरही आला. दिवसअखेर त्यातील घसरण काहीशी सावरली. मंगळवारच्या तुलनेत निफ्टीने १५.१५ अंश घसरणीने ८ हजाराची पातळी कायम राखली. निफ्टी दिवसअखेर ८,००२.४० वर स्थिरावला
न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम म्हणून पोलाद, ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये १० टक्क्यांपर्यंतची आपटी अनुभवली गेली. सप्टेंबरमधील वायदापूर्तीची अखेर नजीक असताना स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, बँक तसेच वाहन समभाग घसरले.
मंगळवारच्या घसरणीतून युरोपातील बाजार अद्यापही वर आलेले नाहीत. तर आशियाई बाजारातही संमिश्र वातावरण राहिले. याचा बुधवारी नकारात्मक प्रभाव दिसून आला.
ऊर्जा-धातू कंपन्या कोळमडल्या!
सर्वोच्च न्यायालयाच्या कोळसा खाणीसंदर्भातील निर्णयाचा सर्वाधिक फटका बसेल अशा पोलाद, ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये नकारार्थी प्रतिक्रिया बुधवारी शेअर बाजारात उमटली. या कंपन्यांच्या समभाग मूल्यांमध्ये जवळपास १० टक्क्य़ांची आपटी, तर मक्तेदार कोल इंडियाचा समभाग मात्र तब्बल ५ टक्क्यांहून उंचावला.