गेले पाच महिने गजाआड असलेले सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांची अंतरिम जामीन वा पॅरोलवर सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी धुडकावली. विधिवत जामीन मिळवण्यासाठी रॉय यांना सेबीकडे दहा हजार कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी न्यूयॉर्क आणि लंडन येथील हॉटेल विकायची अनुमती मात्र त्यांना न्यायालयाने दिली.
न्यूयॉर्कमधील ड्रीम डाऊनटाऊन आणि द प्लाझा तसेच लंडनमधील ग्रॉसव्हेनॉर हाऊस या हॉटेलांसह रॉय यांना भारतातील नऊ मालमत्ता विकण्याचीही अनुमती खंडपीठाने दिली आहे. जामिनासाठी दहा हजार कोटी रुपये उभे करण्यासाठी आपल्याला किमान ४० दिवस पॅरोलवर सोडावे, अशी विनंती ६५ वर्षीय रॉय यांनी केली होती.
रॉय यांना अंतरिम जामीन वा पॅरोलचा दिलासा मिळाला नसला तरी या मालमत्तांच्या विक्रीकरिता पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना रोज सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर जाता येणार आहे. या मालमत्ताखरेदीसाठी पुढे येणाऱ्या लोकांशी यामुळे रॉय यांना तुरुंगाबाहेर चर्चा करणे शक्य होणार आहे. अर्थात या हॉटेलांच्या खरेदीबाबतचा कोणताही ठोस प्रस्ताव या घडीला नसल्याने ही सवलत आताच देता येणार नाही. तसा प्रस्ताव आल्यास रॉय आमच्याकडे अर्ज करू शकतात, असेही न्या. टी. एस. ठाकूर, न्या. अनिल आर. दवे आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
खटल्यातून मुक्त होण्यासाठी सहाराला ३७ हजार कोटी रुपयांची देणी द्यायची आहेत. या       खटल्यात न्यायालयाने आपल्या साहाय्यासाठी ‘अ‍ॅमिकस क्युरी’ म्हणून अ‍ॅड. शेखर नाफडे यांची नियुक्ती केली आहे.

पाच महिने गजाआड..
० गुंतवणूकदारांकडून २०,००० कोटी सहाराने नियमबाह्य़ गोळा केले.
० पैकी ९३ टक्के लोकांचे पैसे परत केल्याचा रॉय यांचा दावा.
० जामिनासाठी सेबीकडे १० हजार कोटी भरणे बंधनकारक.
० त्यातील ५ हजार कोटी हे रोखीत तर उरलेल्या रकमेची बँक हमी आवश्यक
० सहाराने आतापर्यंत सेबीकडे ३,११७ कोटी रुपये भरले.