सहारा समूहाचे प्रमुख सुब्रता रॉय यांचा तुरुंगातून सुट्टीचा अर्थात पॅरोल अर्जाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने येत्या २८ नोव्हेंबपर्यंत वाढवून दिली आहे. रॉय यांनी न्यायालयाची पूर्वअट म्हणून शुक्रवारी आणखी २०० कोटी रुपये जमा केल्यामुळे ही मुदतवाढ दिली गेली.

सहारा समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबतचा नवा आराखडाही सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यानुसार जानेवारी २०१७ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत म्हणजेच दोन वर्षांत ५०० कोटी रुपये सेबीकडे जमा करण्यात येणार आहेत.

रॉय यांच्या पॅरोलबाबत मुख्य न्या. टी. एस. ठाकूर यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यात गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याबाबतचा नवा आराखडा सहाराच्या वकिलांनी सादर केला. बरोबरीने रॉय यांच्या पॅरोलवरील सुटकेसाठी आणखी ४०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविण्यात आली. पैकी २०० कोटी रुपये  शुक्रवारी न्यायालयात जमा केले गेले. आईच्या निधनानंतर रॉय यांना मेमध्ये चार महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. आता नव्याने पॅरोलकरिता मुदतवाढ दिल्यानंतर रॉय यांना ऐन दिवाळीत तुरुंगाबाहेर राहता येणार आहे.

गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे गोळा करून ते अन्यत्र वळविल्याचा आरोप सहारावर आहे. या प्रकरणात भांडवली बाजार नियामक सेबीने कायदेशीर कारवाई सुरू केल्यानंतर रॉय यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात येऊन तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहाराच्या मालमत्ता विक्रीची सेबीला परवानगी दिली आहे.