कर्जदार कमावता नसताना म्हणजे कमावता होण्याच्या पात्रतेसाठी शिक्षण घेत असताना, त्याने त्यासाठी मिळविलेल्या कर्जाची परतफेड त्याला सुलभ बनावी, अशी सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने सुरू केली आहे. बँकेने आपल्या सिंडविद्या आणि सिंड-सुपरविद्या योजनेतील कर्जदारांसाठी त्यांच्या परतफेड क्षमतेनुरूप, हप्त्यांचे (ईएमआय) दर लवचीक ठेवण्याची सुविधा देऊ केली आहे. या सुविधेनुसार शैक्षणिक कर्ज खात्याचा, प्रारंभिक अधिस्थगिती कालावधी संपुष्टात आल्यानंतर, म्हणजे प्रत्यक्षात परतफेड सुरू होते त्या वेळपर्यंतची संचयित व्याजाची रक्कम ही मुद्दलासह एकत्र करून त्या वेळी असणारी कर्जदाराची आर्थिक कुवत पाहून परतफेड हप्त्यांचे प्रमाण हे चर्चेनंतर निश्चित केले जाते. जशी कर्जदाराची आर्थिक कुवत उंचावत जाईल, तसतसे हप्त्याची मात्राही उंचावत नेणारी (स्टेप अप रिपेमेंट फॅसिलिटी- सर्फ) सुविधा शैक्षणिक कर्जाबाबत सिंडिकेट बँक ही देशातील पहिलीच बँक आहे. बँकेकडून ७.५ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज कोणत्याही तारणाविना आणि ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जामीनदाराविना दिले जाते. प्रक्रिया शुल्क व दस्तावेज शुल्क शून्य असलेले हे कर्ज कमाल १५ वर्षे मुदतीसाठी वितरित केले जाते.