नाइट फ्रँकद्वारे ३० मालमत्तांचा होणार लिलाव

बेकायदेशीररीत्या ठेवी गोळा करून गुंतवणूकदारांचे पैसे थकविल्याप्रकरणी गजाआड असलेल्या सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाच्या मालमत्ता विकत घेण्यासाठी देशातील प्रमुख उद्योग घराण्यांनी उत्सुकता दर्शविल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे परत फेडण्यासाठी या प्रकरणात फिर्यादी असलेल्या ‘सेबी’ला सहाराच्या मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया राबविण्यास फर्मावले आहे.

टाटा, गोदरेज, अदानी या उद्योगघराण्यांपासून ते पतंजलीनेही सहारा यांच्या मालमत्ता विकत घेण्यात रस दाखवला आहे. सहारा समूहाच्या मालकीच्या सुमारे ७,४०० कोटी रुपये मूल्याच्या ३० मालमत्ता विकत घेण्यात या कंपन्यांनी रस दाखवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो रॉय यांना तातडीने सेबीकडे पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. सहारा समूहाच्या संपत्तीचा लिलाव होणार असून लिलाव प्रक्रिया नाइट फ्रँक इंडिया या कंपनीमार्फत पार पाडली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहारा समूहाची मालमत्ता विकत घेण्यात ओमेक्स, एल्डेको तसेच इंडियन ऑइल अशा विविध कंपन्यांनी रस दाखवला आहे. लखनौमधील सहारा रुग्णालय विकत घेण्यासाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालय इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि या लिलाव प्रक्रियेतून योग्य तो भाव मिळेल का यावरही आता शंका उपस्थित होत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सुब्रतो रॉय यांना तातडीने पैसे भरायचे आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत फार वेळ घालवता येणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. लिलाव प्रक्रियेतील मालमत्तांसाठी बोली सुरू करण्यासाठी निश्चित आधार दर हे जास्त आहेत. त्यामुळे इच्छुक खरेदीदार २ ते ३ महिन्याचा अवधी मागत असल्याचे समजते.

गोदरेज, पतंजली, टाटा असे मोठे उद्योग समूहदेखील या लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील अशी चर्चा आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या अधिकाऱ्यांनी लिलावप्रक्रियेत सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नाइट फ्रँक कंपनीकडून आयोजित लिलाव प्रक्रियेत आम्ही सहभागी होऊ  असे गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालकांनी सांगितले. सहारा समूहाच्या पुण्यातील मालमत्तेसाठी गोदरेज समूह बोली लावणार असे समजते. पतंजली, टाटा या कंपन्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताज मानसिंगच्या लिलावतही टाटांचे स्वारस्य

नवी दिल्ली : टाटा समूहातील कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने नवी दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलच्या ई-लिलावात सहभागाचा मानस स्पष्ट केला आहे. टाटा समूहाकडून कैक दशके व्यवस्थापन पाहिले जाणाऱ्या या हॉटेलची मालकीही मिळविण्यासाठी समूहाची उत्सुकता आहे.

राष्ट्रीय राजधानीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉटेलचा लिलाव करण्याला सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महानगर पालिकेला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या लिलावाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका  ८ नोव्हेंबर २०१६ रोजी इंडियन हॉटेल्सने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तथापि निकाल जरी दिल्ली महानगरपालिकेच्या बाजूने लागला असला तरी ई-लिलावात सहभाग घेऊन, ताज मानसिंगचे संपादन केले जाईल, अशी प्रतिक्रिया कंपनीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.

दरम्यान प्रत्यक्ष लिलावात देकार मिळविण्यास इंडियन हॉटेल्सला अपयश आल्यास, हॉटेल रिकामे करण्यासाठी कंपनीला सहा महिन्यांचा अवधी दिला जावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दिल्ली पालिकेची मालमत्ता असलेले ताज मानसिंग हॉटेल ३३ वर्षांच्या भाडेपट्टीवर टाटा समूहाला दिले गेले होते. भाडेपट्टीची मुदत २०११ साली संपुष्टात आल्यानंतर, भाडे कराराला नऊ वेळा तात्पुरती मुदतवाढ दिली गेली आहे. तथापि पालिकेने सर्वोच्च न्यायालयात या हॉटेलच्या लिलावाचा आपला आग्रह कायम असल्याचे सांगत, आपल्या बाजूने निकालही मिळविला आहे.