टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले नटराजन चंद्रशेखरन यांची आज, मंगळवारी टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली आहे. १२ जानेवारीला चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यापूर्वी ते टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकही आहेत.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी ५४ वर्षीय नटराजन चंद्रशेखरन यांच्या निवडीचे भारताच्या उद्योगक्षेत्रातून सहर्ष स्वागताचा सूर उमटला होता. विशेषत: टाटा समूहाच्या मूल्यसंस्कृती आणि आदर्श परंपरांना देशाच्या उद्योगक्षेत्रात अजोड महत्त्व असून, त्यांच्या जतन होण्याच्या दृष्टीने सुयोग्य व्यक्तीची निवड झाल्याबद्दल समाधानाचा सूरही अनेकांनी व्यक्त केला होता. टाटांच्या प्रतिष्ठेला मध्यंतरी आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीतून लागलेला बट्टा, गुंतवणूकदारांचा ढळलेला आत्मविश्वास या पाश्र्वभूमीवर अधिक विलंब न करता चंद्रशेखर यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही देशातील एक विश्वासपात्र उद्योगसमूह म्हणून टाटांच्या नाममुद्रेला पुन:प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावेल, असा विश्वास गुंतवणूकदार समूहातही म्हणूनच व्यक्त होत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक पाश्र्वभूमी असलेल्या चंद्रशेखरन यांच्याकडे अध्यक्षपद आल्याने टाटा समूहाला आवश्यक असलेला आधुनिक डिजिटल तोंडावळा त्यांच्याकडून दिला जाईल, अशीही अपेक्षा केली जात आहे.

दरम्यान, टाटा सन्सकडून २४ ऑक्टोबरला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील सहा कंपन्यांच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर मिस्त्री यांनी टाटा समूहाला न्यायालयात खेचले होते. टाटा उद्योग समुहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबरला तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. अवघ्या ४२ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय अत्यंत अनपेक्षित असा होता. काल टाटा सन्सच्या संचालक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा या दोन विश्वस्त मंडळांकडे टाटा सन्सच्या अध्यक्षाच्या निवडीचा आणि त्याला हटविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी दोन्ही विश्वस्त मंडळांची स्वतंत्र तीन सदस्यीय समिती आहे. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टची मिळून ६६ टक्के इतकी मालकी आहे. तर, मिस्त्री यांच्या शापुरजी पालनजी कुटंबियांचा टाटा सन्समध्ये सर्वाधिक १८.४ टक्के इतका वाटा आहे. शापुरजी पालनजी समुहाने सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून दूर करणे, अवैध असल्याचे म्हटले होते.