भारतीय लष्कराला १२०० मल्टी अॅक्सल ट्रक पुरवण्याचे ९०० कोटी रुपयांचे कंत्राट टाटा मोटर्सला मिळाले आहे. लष्कराने भारतीय कंपनीला दिलेले हे सर्वात मोठे कंत्राट असून, सहा बाय सहाचे मल्टी अॅक्सल स्वरूपाचे १२०० ट्रक कंपनी पुरवणार आहे, असे टाटा मोटर्सच्या निवेदनात म्हटले आहे. हे ट्रक बंदुकीच्या गोळय़ा, सुटे भाग व इतर सामग्रीची ने-आण करण्यासाठी वापरले जाणार आहेत. संरक्षण क्षेत्रात वाहने पुरवण्याच्या क्षेत्रात तीन वर्षांमध्ये चार हजार कोटींचा व्यवसाय करण्याचा कंपनीचा विचार आहे.
स्वदेशी बनावटीचे हे ट्रक प्रतिकूल भागातही काम करू शकतील. त्यांची २५ महिने चाचणी घेण्यात आली आहे. टाटा मोटर्सला या कामगिरीचा अभिमान वाटतो व लष्कराला आम्ही तंत्रप्रगत असे ट्रक पुरवणार असल्याने मालाची ने-आण करणे फार सोपे होईल, असे टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष व्हेरनोन नोऱ्होन यांनी सांगितले. टाटा मोटर्सच्या वृद्धी क्षमतेमुळेच हे कंत्राट मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले, की हे ट्रक लवकरच भारतीय लष्कराला दिले जातील. टाटा मोटर्स १९५८ पासून संरक्षण क्षेत्राशी संबंधित असून, आतापर्यंत लष्कर व निमलष्करी दलास १ लाख वाहने पुरवली आहेत. देशांतर्गत बाजारपेठेची गरज ओळखून आमची उत्पादने तयार केलेली असून, जगातील अतिशय कठोर निकषांची पूर्तता करण्यात आली आहे. मुंबई येथील टाटा मोटर्स कंपनी सार्क, आसियान व आफ्रिका या भागातील देशांना संरक्षण वाहने पुरवते. टाटा मोटर्सचा समभाग यातून मुंबई शेअर बाजारात ०.९५ टक्क्यांनी वधारला.