‘लाखाची कार’ प्रतिमा असलेल्या नॅनोला तिच्या पदार्पणापासून तरुण वर्गाकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात टाटा मोटर्सने खास श्रेणीतील प्रवासी कार सादर केली आहे. असे करताना रंग, अंतर्गत रचना याचबरोबर संगीत व माहिती तंत्रज्ञानाची जोड या नव्या नॅनोला देण्यात आली आहे. अर्थातच तिची किंमतही तशी अधिक, २.३६ लाख रुपये (एक्स शोरूम-नवी दिल्ली) आहे.
२००८ मध्ये टाटा मोटर्सचा सुरू झालेला ‘लाखाच्या कार’चा प्रवास सुरुवातीच्या काळात फारच अडखळला. आकर्षक रंग, डिझाईन तसेच कल्पक मोहिमांच्या जोडीने गेल्या दोन वर्षांत या कारची विक्री पुन्हा मार्गक्रमण करू लागली. निवृत्तीच्या वर्षपूर्तीप्रसंगी टाटा समूहाचे रतन टाटा यांनीही नॅनोचे विपणन तंत्र चुकल्याची कबुली दिली होती.
२०१२ पूर्वी १८ ते ३४ या तरुण वर्गाचे छोटय़ा नॅनो खरेदीचे प्रमाण अवघे २० टक्के असताना गेल्या दोन वर्षांत मात्र ते तब्बल ४५ टक्के झाले आहे. तसेच ३५ वर्षांवरील दोन वर्षांपूर्वीचे ग्राहकप्रमाण ५० टक्क्यांवरून आता ५५ टक्के झाले आहे. एकूणच तरुण वर्गाने नॅनोला पसंती दिल्याचे लक्षात घेत कंपनीने आता खास या वर्गासाठी तिची नवी आवृत्ती सादर केली आहे.
टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष रणजीत यादव यांनी नवी नॅनो २५.४ किलोमीटर प्रति लिटर इंधन क्षमता देईल तसेच आधीच्या वाहनापेक्षा तिची अंतर्गत जागा ही २१ टक्के अधिक असल्याचेही सांगितले. पॉवर स्टेअरिंग, डिजिटल क्लॉक तसेच एसयूव्हीसारखे ग्राऊंड क्लिअरन्स हे नव्या नॅनोच्या रूपात छोटय़ा प्रवासी वाहन श्रेणीत टाटाने प्रथमच विकसित केल्याचेही ते म्हणाले.
‘नॅनो ट्विस्ट’ (एक्सटी) नावाच्या या नव्या वाहनामध्ये (जांभळ्या रंगासह) तीन आकर्षक रंगांची जोड देण्यात आली असून, इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग, डिजिटल क्लॉक सिस्टीम, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम तसेच रिमोट की लेस एन्ट्री पुरविण्यात आली आहे. तरुणाईला संगीत, माहिती तंत्रज्ञानाचा आनंद आणि लाभ देण्याच्या दृष्टीने या कारमध्ये सुविधा आहेत.
गेल्या पाच वर्षांत एक ते सव्वा लाख नॅनो विकल्या गेल्या आहेत. नॅनो श्रीलंका आणि नेपाळमध्येही निर्यात होते. नॅनोची सध्या सर्वात कमी किंमत १.५५ लाख रुपये असून यापूर्वीची तिच्या सर्वात महागडय़ा एलएक्स श्रेणीच्या जागी नवी अद्ययावत एक्सटी कार तयार करण्यात आली आहे. तिची किंमत आधीच्या शेवटच्या श्रेणीतील (हाय एण्ड) वाहनापेक्षा १४ हजार रुपयांनी अधिक आहे.

डिझेल नॅनोला   ‘ऑटो एक्स्पो’चा मुहूर्त?
नवी दिल्लीबाहेर होऊ घातलेल्या पुढील महिन्याच्या वाहन प्रदर्शनात टाटा मोटर्स डिझेल इंधनावर धावणारी नॅनो सादर करण्याची अधिक शक्यता आहे. नॅनो ट्विस्ट एक्सटी हे कंपनीचे नव्या वर्षांतील पहिले वाहन असून सीएनजीवरील नॅनो कंपनीने गेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात आणली. कंपनी ‘होरायझनेक्स्ट’ मोहिमेद्वारे नॅनोसह तिच्या निवडक प्रवासी वाहनांची सुधारित श्रेणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सादर करत आहे.