टाटा मोटर्सने कॉम्पॅक्ट सेदान श्रेणीतील नवी ‘झेस्ट’ ही कार मंगळवारी मुंबईत सादर केली. कंपनीने तब्बल चार वर्षांनंतर या श्रेणीत नवीन वाहन सादर केले आहे.
कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष रणजित यादव यांच्या उपस्थितीत सादर झालेली कार पेट्रोल तसेच डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध होत आहे. शिवाय सेदान श्रेणीत आतापर्यंत नसलेली  तब्बल २९ वैशिष्टय़े झेस्टमध्ये समाविष्ट केली गेली आहेत.
रेव्हट्रॉन १.२ टी व १.३ क्वाड्राजेट इंजिन यामध्ये बसविण्यात आले आहे. प्रति लिटर १७.६ व २३ किलोमीटर इंधन क्षमता ही कार देईल.
विविध चार ते पाच प्रकारात व सहा आकर्षक रंगात ती उपलब्ध झेस्टची किंमत ४.६४ ते ५.६४ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.
ही कार कंपनीच्या पुण्यानजीकच्या पिंपरी आणि रांजणगाव प्रकल्पात तयार करण्यात आली आहे.
सेदान श्रेणीतील ही कार सादर केल्यानंतर कंपनी ‘बोल्ट’ हे बहुप्रतिक्षित हॅचबॅक श्रेणीतील वाहन लवकरच बाजारात आणणार आहे. ही कार फेब्रुवारीमध्ये नोएडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शनात सादर करण्यात आली होती.