प्रवासी वाहन विक्रीत सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या टाटा मोटर्समध्ये अंशत: स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. कंपनीचे देशभरात १६ हजारांहून अधिक कामगार आहेत; पैकी किती जणांना नारळ दिला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
स्पर्धेत टिकण्यासाठी घेतलेल्या काही प्रोत्साहनपूरक योजनांमध्ये स्वेच्छानिवृत्तीचाही समावेश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रकल्पस्थळावरील कामगार ते व्यवस्थापकपदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश असेल. त्या उलट स्वेच्छानिवृत्ती केवळ कामगारांसाठीच राबविण्यात येणार आहे. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन (मूळ व महागाई भत्ता) योजना कालावधीपासून ते त्याच्या वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय विमाछत्रही १० वर्षांसाठी पुरविण्यात येणार आहे. याशिवाय भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, सुटय़ांसाठीचे वेतन आदीही मिळेल. ही योजना स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रवासी भत्त्यासाठीचा दावा करता येणार नाही.