कारचे बारसे होण्याआधीच टाटांवर नामांतराची पाळी!
टाटा मोटर्सने ग्रेटर नोएडातील वाहन उद्योगाच्या वार्षिक मेळ्यात बारसे करण्यासाठी सज्ज केलेली आपली हॅचबॅक श्रेणीतील नवी छोटेखानी कार ‘झिका’चे पूर्वनियोजनाप्रमाणे यथोचित अनावरण बुधवारी केले, पण तिच्यासाठी नवे नाव शोधत असल्याचे कंपनीला जाहीर करावे लागले. ऑटो एक्स्पोच्या तोंडावरच फैलावलेल्या झिका विषाणूच्या संसर्गाने भारतात व तोही उद्योगक्षेत्रात घेतलेला हा पहिला बळी ठरला.
नोएडातील ऑटो एक्स्पोच्या तोंडावरच दक्षिण अमेरिकेत, विशेषत: कॅरेबियन बेटांवर पसरलेली झिका विषाणूची साथ आणि या नामसाधम्र्याचा नियोजित कारच्या वाणिज्यिक यशाला फटका बसू नये म्हणून कंपनीला हा घाईघाईने निर्णय घेणे भाग पडले. तथापि बुधवारी टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या उपस्थितीत या नियोजित हॅचबॅकची पहिली झलक दाखविण्यात आली, पण ती ‘झिका’ या लेबलासहच! ऐनवेळी आवश्यक फेरबदल करणे शक्य नसल्याने असे झाले असले तरी आठवडाभरात नवे नामाभिधान शोधले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ‘झिप्पी कार’ अशा अर्थाने त्याचे संक्षिप्त रूप म्हणून ‘झिका’ अशी या नावामागे कंपनीची संकल्पना होती.