मुंबईच्या उपनगरातील वीज ग्राहक आपल्या वितरण सेवेच्या जाळ्यात ओढण्यासाठी टाटा पॉवरने सुरू केलेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागले आहे. तब्बल १२०० कोटी रुपये गुंतवून वितरण जाळे सुदृढ केल्याने, आता उपनगरांत जास्तीत जास्त ग्राहकांना दर्जेदार सेवा देता येईल, असा विश्वास टाटा पॉवरचे मुख्य परिचालन अधिकारी अशोक सेठी यांनी व्यक्त केला.
टाटा पॉवरतर्फे सध्या मुंबईत, विशेषत उपनगरांत ८५० मेगावॉट वीजपुरवठा केला जातो. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र धोरणांमुळे काही बंधने शिथील होण्याची शक्यता असल्याने आता उपनगरांतील जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यावर कंपनीचा भर राहील, असेही सेठी म्हणाले.
निवासी इमारतींना वीजपुरवठा करण्यासाठी कमीत कमी जागेत मावणारे अत्याधुनिक व सुरक्षित ट्रान्सफॉर्मर बसविल्यामुळे मुंबईतील जागेच्या अडचणीवर मात करणे शक्य झाले आहे, तसेच वीज देयके भरण्यासाठी रांगेत ताटकळण्याचा ग्राहकांचा वेळ वाचविण्याकरिता जागेवरच बील भरण्याची संकल्पना मालाडमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे, असे सेठी यांनी सांगितले. त्यांच्या मते ही संकल्पना लवकरच उपनगरात सर्वत्र राबविणे शक्य होईल. वीजमीटरची नोंद घेण्यासाठी घरोघरी जाणारा कर्मचारी त्याच वेळी वीजबिल देऊ शकेल आणि ग्राहकास त्याच्याकडेच तातडीने बील भरणा करणेही शक्य होईल, अशी योजनाही राबविण्यात येत असून ग्राहकांच्या वेळेची मोठी बचत होत असल्याने, उपनगरातील टाटा पॉवरचे ग्राहक समाधानी आहेत, असा दावा सेठी यांनी केला. मोबाईलवर वीजबिल उपलब्ध करून देऊन मोबाईलद्वारे बिलाचा भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना देण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. यापुढे जास्तीत जास्त ग्राहक सेवा मोबाईलद्वारे पुरविण्यावर कंपनीचा भर राहील, असे ते म्हणाले.
कंपनीच्या प्रकल्पांमध्ये ९,१८३ मेगावॉट वीजनिमिती होते. त्यात २०२२ पर्यंत ३० ते ४० टक्के अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे योगदान मिळविण्याचा कंपनीचा मानस आहे. निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांमध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती सुरू आहे. इमारतीच्या गच्चीवर सोसायटीमार्फत केल्या जाणाऱ्या सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहनाचीही कंपनीने पावले उचलली आहे. अशा तऱ््हेने निर्मिती झालेली सौरउर्जा घेऊन त्या बदल्यात त्यांच्या वीज बिलामध्ये सवलत देण्यात येते.