सध्या देशात सर्वाधिक ३०६० मेगावॉटची स्थापित क्षमता

अपारंपरिक आणि अक्षय्य ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मिती क्षमतेत उत्तरोत्तर वाढ करीत देशातील सर्वात मोठी एकात्मिक वीजनिर्मिती कंपनी बनल्याचा टाटा पॉवरने दावा केला आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मिती क्षमता ३०६० मेगावॉटवर पोहोचल्याचे कंपनीने अलीकडेच जाहीर केले.

टाटा पॉवर ही अजीवाश्म इंधनाचा वापर करणारी देशातील सर्वात मोठी वीजनिर्मिती कंपनी बनली आहे. कंपनीच्या अपारंपरिक स्रोतांपासून वीजनिर्मितीत आता ६९३ मेगावॉट जलविद्युत, ९१८ मेगावॉट सौर ऊर्जा, १०७४ मेगावॉट पवन ऊर्जा आणि ३७५ मेगावॉट कचरा आणि वायूपासून वीजनिर्मितीचा समावेश आहे. या दिशेने एक पाऊल पुढे टाकत कंपनीने २०२५ सालापर्यंत अक्षय्य स्रोतांवर आधारित क्षमता ३५ ते ४० टक्कय़ांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी स्पष्ट केले.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांत पवन ऊर्जा क्षमतेत ८२ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. २०१५-१६च्या आर्थिक वर्षांत ५९१ मेगावॉट असलेली ही क्षमता आता १०७४ मेगावॉटवर गेली आहे. चालू आर्थिक वर्षांत सौर ऊर्जा क्षमतेतही १५३९ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. आधीच्या वर्षांत असलेली ५६ मेगावॉटची क्षमता एका आर्थिक वर्षांत ९१८ मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. टाटा पॉवरचे अनेक अक्षय्य ऊर्जा प्रकल्प सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरू आहेत. विविध ठिकाणी ५०० मेगावॉट क्षमतेचे अक्षय्य ऊर्जा प्रकल्प उभारण्याची टाटा पॉवरची प्रक्रिया सुरू आहे.

टाटा पॉवरच्या मालकीची उपकंपनी टाटा पॉवर अक्षय ऊर्जा लिमिटेडने गतवर्षी वेलस्पन रिन्यूएबल्स एनर्जी ही कंपनी संपादित केली. वेलस्पनचे जवळपास १० राज्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. जवळपास १००८ मेगावॉटच्या अक्षय्य ऊर्जा प्रकल्पांमधून सौर ऊर्जेपासून ८६२ आणि पवन ऊर्जेपासून १४६ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे, अशी सरदाना यांनी माहिती दिली.