देशातील सर्वात मोठी खासगी वीज कंपनी टाटा पॉवरने उपकंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडमार्फत (टीपीआरईएल) २५ मेगावॅट क्षमतेचा ‘सोलार फोटोव्होल्टेइक’ (पीव्ही) ऊर्जा प्रकल्प विकसित केला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात तयार असलेला हा प्रकल्प वाहिन्या व उपकेंद्रांमध्ये ‘शटडाऊन’ उपलब्ध नसल्याने राज्य ग्रिडला जोडता आला नाही.
राज्यातील सातारा जिल्ह्य़ातील माण तालुक्याच्या पळसवाडी येथे १३० एकर जागेवर हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात ‘क्रिस्टलाइन सिलिकॉन फोटो-व्होल्टाइक’ तंत्रज्ञान वापरण्यात येते. दरवर्षी या प्रकल्पात जवळपास ४६ मेगा युनिट वीज निर्माण केली जाईल. यामुळे टाटा पॉवरला सौर ऊर्जेच्या बाबतीत ‘रिन्युएबल परचेस ऑब्लिगेशन्स’ (आरपीओ) पूर्ण करण्यात मदत मिळेल.
राज्यात खासगी वीज कंपनीकडून उभारल्या गेलेल्या सर्वात मोठय़ा प्रकल्पांपकी हा प्रकल्प असून राज्य पारेषण जाळ्यांमधून यातील वीज वाहून नेली जाईल.    
माण तालुका हा राज्यातील पाण्याचा तुटवडा असणारा दुष्काळी भाग आहे. या दृष्टीने कंपनीने पावसाचे पाणी साठविण्यासाठी बंधारे बांधले आहेत.
याबाबत टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सारदाना यांनी सांगितले की, २५ मेगावॅट क्षमतेच्या जवळपास २५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला कर्ज व समभागामार्फत वित्तपुरवठा करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये ‘आयडीएफसी लिमिटेड’मार्फत सर्व आवश्यक कर्जे मिळविण्यात कंपनीला यश मिळाले आहे. याबाबतच्या आíथक करारांवर याच महिन्यात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
टाटा पॉवरने गुजरातेतील मिठापूर येथे २५ मेगावॅट क्षमतेचा व महाराष्ट्रातील मुळशी येथे ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. कंपनीचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प १९९६ मध्ये महाराष्ट्रातील लोणावळ्यातील वाल्व्हन येथे उभारण्यात आला होता. टाटा पॉवरकडे ५६ पेक्षा जास्त मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा व ४६१ मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत.