निर्णयप्रक्रियेत कोंडी केली गेल्याचा सायरस मिस्त्री यांचा आरोप

टाटा सन्सचे अध्यक्षपद आपल्याकडे असले तरी आपण घेतलेले निर्णय फिरविले जात असत. टाटा सन्सवर थेटपणे टाटा ट्रस्टचाच वरचष्मा होता, असा त्रागा अध्यक्षपदावरून तडकाफडकी उचलबांगडी झालेल्या सायरस मिस्त्री यांनी नोंदविला.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सोमवारी दूर लोटले गेल्यानंतर मिस्त्री यांनी दुसऱ्या दिवशी टाटा सन्सच्या संचालक मंडळ सदस्यांबरोबरच टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना लिहिलेल्या ई-मेल संदेशामध्ये ही बाब नमूद केली आहे. समाजमाध्यमांमधून हे पत्र बुधवारी जगजाहीर झाले आणि त्यातून अनेक धक्कादायक आक्षेप पुढे आले.

यात मिस्त्री यांचा दावा असा की, डिसेंबर २०१२ मध्ये जेव्हा आपल्याला टाटा सन्सचा अध्यक्ष बनविले तेव्हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला पुरती मोकळीक असेल, असे सांगितले गेले होते. मात्र यानंतर टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स यांच्यामधील संबंधांविषयी संस्थेच्या कलमांमध्ये बदल करण्यात आले. टाटा सन्सवर याद्वारे एकप्रकारे टाटा ट्रस्टचेच नियंत्रण प्रस्थापित झाले. टाटा सन्ससाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करण्याचे अधिकार टाटा ट्रस्टकडे राखून ठेवण्यात आले होते. संचालक मंडळावर असलेले टाटा ट्रस्टचे सदस्य (नितीन नोहरिया आणि विजय सिंह) हे रतन टाटा यांच्याकडून आलेल्या निरोपानंतर टाटा सन्सच्या बैठक अर्धवट सोडून मधूनच निघून जात. तेव्हाच मी व टाटा यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचे मला जाणवले.

सोमवारच्या घडामोडीचा पत्रात उल्लेख करताना मिस्त्री म्हणाले  की, ‘सोमवारी जेव्हा समूहाच्या संचालक मंडळाची बैठक सुरू होती तेव्हा अध्यक्षपदावरून दूर करण्याबाबत आपल्याला काहीही कल्पना दिली गेली नाही. तसेच त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण अथवा बाजू मांडण्याची संधीही मला दिली गेली नाही. अचानक घेण्यात येणारे निर्णय आणि स्पष्टीकरणाचा अभाव याचा विपरीत परिणाम माझ्याबरोबरच टाटा समूहाच्या प्रतिमेवर झाला आहे.’ कामगिरीचा निकष लावून आपल्याला बाजूला केले गेले, हे मला पटत नाही. अगदी अलीकडे कौतुक करणाऱ्या संचालक मंडळातील दोन सदस्यांनी सोमवारी मला बाजूला करण्याच्या बाजूने मतदान करावे हेही माझ्याकडे आश्चर्य वाटते.

‘रतन टाटांचा अवाजवी रस नडला’

मुंबई : टाटा समूहातील अनेक कंपन्यांबाबत, त्यांच्या विस्ताराबाबत, नव्या उत्पादनाबाबत रतन टाटा यांचा अवाजवी रस कायम राहिला; त्यांची भावनिक गुंतवणूक हस्तक्षेपापर्यंत सुरू होती, अशा शब्दांत मिस्त्री यांनी टाटा यांच्यावर ई-मेलमध्ये आक्षेप नोंदविला आहे.

रतन टाटा यांनी भावनिकतेऐवजी व्यवसाय लाभाच्या दृष्टीने निर्णय घेतले असते तर समूहाचे आजचे चित्र अधिक आशादायी असते, असे मिस्त्री यांनी टाटा समूहाचे संचालक तसेच टाटा ट्रस्टचे विश्वस्त यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टाटा समूहातील मुख्य पाच कंपन्यांच्या कारभारावर मिस्त्री यांनी टीका केली आहे. समूहातील टाटा मोटर्स, टाटा स्टील युरोप, टाटा पॉवर मुंद्रा, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व इंडियन हॉटेल्स यांच्याबाबतचे निर्णय कसे चुकले हे स्पष्ट करत टाटा समूहाचा नागरी हवाई क्षेत्रातील एकूणच प्रवेश आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य व समूहाला गर्तेत नेणारा होता, असे त्यांनी नमूद केले आहे.

याचबरोबर पायाभूत सेवा क्षेत्राला दिलेली कर्जे टाटा कॅपिटलने त्वरित परत घेणे गरजेचे होते; टेटली आणि जग्वार लँड रोव्हर खरेदी केल्यामुळे टाटा समूहावर कर्जाचा भार वाढला, असे आक्षेपही मिस्त्री यांनी पत्रात नोंदविले आहेत.

आतबट्टय़ाचा कारभार : मिस्त्री यांचे आरोप

  • टाटा मोटर्स : नॅनो प्रकल्प सातत्याने तोटय़ात जात होता, मात्र केवळ रतन टाटा यांच्या भावनिक गुंतवणुकीपोटीच तो बंद करण्यात येत नव्हता. एक लाखाची कार देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याचा उत्पादन खर्च यापेक्षा खूप अधिक होता. यामुळे १,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
  • एअर एशिया-सिंगापूर एअरलाइन्स : नागरी हवाई व्यवसाय भागीदारीसाठी विदेशी कंपन्यांबरोबर हातमिळवणी करण्याचे टाटा समूहाचे धोरण चुकले. यासाठी समूहाने आधी दिलेल्या आश्वासनाव्यतिरिक्त मोठी गुंतवणूक हवाई कंपन्यांमध्ये केली. भारत तसेच सिंगापूरमध्ये अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमध्ये २२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे तपास प्रकरण म्हणूनच निर्माण झाले.
  • टाटा केमिकल्स : उपकंपनीचा धडक विस्तार कार्यक्रम राबविताना कठोर निर्णय घेणेही आवश्यक होते. कंपनीच्या ब्रिटन तसेच केनियातील व्यवसायाबाबतही काही ठोस पावले उचलणे गरजेचे होते.
  • इंडियन हॉटेल : इंडियन हॉटेल्सने विदेशातील मालमत्ता चढय़ा भावाने खरेदी केली आणि त्याचा भार अप्रत्यक्षपणे कंपनीच्या ताळेबंदावर पडला. गेल्या तीन वर्षांत इंडियन हॉटेलच्या नक्त मालमत्तेला भरुदड सहन करावा लागला आहे. यामुळे कंपनी लाभांशही देऊ शकलेली नाही.
  • टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस : समूहातील दूरसंचार व्यवसाय तर आधीपासूनच तोटय़ात होता. यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक होते. हा व्यवसाय विकला अथवा बंद केला असता तर त्याचा खर्च ४ ते ५ अब्ज डॉलर असता. कंपनीला सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील (डोकोमो) दंडाचा सामना करावा लागला नसता.
  • टाटा स्टील : १० अब्ज डॉलरच्या युरोपातील आतबट्टय़ाच्या पोलाद व्यवसायातून खरे तर खूप लाभ मिळणे शक्य होते. विदेशातील अनेक स्टील प्रकल्प हे फायद्याचे होते; मात्र त्यातील काही व्यवसाय हे तोटा सहन करत विकण्यात आले.
  • टाटा पॉवर : इंडोनेशियातून स्वस्त कोळशाच्या पुरवठा यावर टाटा पॉवरच्या मुंद्रा प्रकल्पाची भिस्त होती. मात्र नंतर सारे नियमच बदलल्यामुळे एकटय़ा २०१३-१४ आर्थिक वर्षांत कंपनीला १,५०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.