टाटा समूहाची सिंगापूर एअरलाइन्ससह भागीदारीने स्थापित झालेली प्रवासी हवाई वाहतूक सेवा ‘विस्तार’ची येत्या ९ जानेवारी २०१५ पासून नियमित उड्डाणे सुरू होतील. दिल्लीहून मुंबई आणि अहमदाबादसाठी दैनंदिन उड्डाणे असणाऱ्या या सेवेसाठी तिकीटांचे आरक्षणही सुरू झाल्याचे शुक्रवारी अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
एअरबसच्या ए३२०-२०० जातीच्या नवीन विमानातून दिल्ली-मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-अहमदाबाद-दिल्ली अशा ‘विस्तार’च्या पहिल्या उड्डाणांसाठी तिकीटांचे ऑनलाइन तसेच वितरकांच्या माध्यमातून आरक्षणांना सुरुवात झाली असल्याचे कंपनीने गुरुवारी रात्री जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये सांगितले. या विमानात ‘बिझनेस केबिन’साठी १६ आसने, ‘प्रीमियम इकॉनॉमी’ श्रेणीची ३६ तर ‘इकॉनॉमी’ श्रेणीची ९६ आसने असतील.
‘मेक माय ट्रिप’वर विस्तारच्या ३० दिवस आगाऊ आरक्षणासाठी दिल्ली-मुंबई उड्डाणासाठी ५,५०० रुपयांपासून भाडे सुरू होते, तर दिल्ली-अहमदाबाद ४,९०० रुपये तर मुंबई-अहमदाबादसाठी ३,८०० रुपयांपासून भाडे सुरू होईल. लक्षणीय म्हणजे गुजरातमध्ये उद्योगक्षेत्राचा महामेळा ‘व्हायब्रन्ट गुजरात’ परिषदेच्या एक दिवस आधीच विस्तारची अहमदाबादसाठी सेवा सुरू होत आहे.