टाटा समूहाचे मिस्त्रींना प्रत्युत्तर; प्रतिमा मलीन केल्याचा ठपका

टाटा समूहावर हल्ला चढविताना सायरस मिस्त्री यांनी पोकळ दावे आणि दुर्भावनायुक्त आरोप केल्याचे स्पष्ट करत टाटा सन्सने गुरुवारी मिस्त्री यांनी मोठय़ा प्रमाणावर संचालक मंडळावरील सदस्यांचा विश्वास गमावल्याचा दावा केला. मिस्त्री यांना अध्यक्ष म्हणून सर्वाधिकार दिले होते, असेही समूहाने गुरुवारी दिलेल्या प्रत्युत्तरात नमूद केले आहे. मिस्त्री यांनी लिहिलेले पत्र प्रसिद्ध होणे दुर्दैवी असून यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये समूहाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपकाही समूहाने ठेवला आहे.

टाटा समूहातून अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर मिस्त्री यांनी समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्वस्तांना लिहिलेल्या इ-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती. याबाबत टाटा समूहाच्या प्रवक्त्याने गुरुवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात मिस्त्री यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्य व विश्वस्तांना लिहिलेल्या व प्रसिद्ध झालेल्या पत्राबाबतची घडामोड अयोग्य असल्याचे नमूद करत हा एक ‘पोरकट’पणा असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे. आपल्याला ‘कर्जबुडवा’ २अध्यक्ष म्हणून पुढे केले गेल्याचा मिस्त्री यांचा आरोपही निराधार असल्याचे समूहाने म्हटले आहे. टाटा समूह आणि तिच्या कंपन्या यांचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकारी अध्यक्षाला पूर्ण अधिकार होते, असे नमूद करत टाटा सन्सच्या पत्रात, टाटा समूहाने घेतलेल्या निर्णयांमध्ये माजी अध्यक्षांचाही सहभाग होता, असे म्हटले आहे.

पदावरून काढताच मिस्त्री यांनी आरोपांचा सपाटा लावला, अशी टीकाही या पत्रात करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सायरस मिस्त्री, माजी अध्यक्ष, टाटा सन्स हे समूहाच्या संचालक मंडळात २००६ पासून आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली. २८ डिसेंबर २०१२ मध्ये ते टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. तेव्हा टाटा समूहाच्या संपूर्ण संस्कृती, कंपनी सुशासन तसेच वित्तीय बाजुंबाबत ते पूर्णपणे अवगत होते. मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्यांना पत्र लिहून त्यांच्याप्रतीही अविश्वास दाखविला असून समूहाच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नजरेतही प्रतिमा खराब केली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

हंगामी अध्यक्षांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या त्यांच्या पहिल्याच संवादात व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहेच, यावर पत्रात भर देण्यात आला आहे. संचालकांना समूहावरील कर्जभार कमी करण्याबाबत प्रयत्न करण्याचे सांगण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.

..तर कारवाई

एअर एशिया सेवा व्यवसायाच्या माध्यमातून काही गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असे गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले.