मिस्त्रींना समूहाबाहेर हिस्साविक्रीस प्रतिबंध; भागधारकांची मंजुरी

निष्कासित सायरस मिस्त्री यांना आपला हिस्सा समूहाबाहेरील व्यक्ती, कंपन्यांना विकण्यास प्रतिबंध करणाच्या दिशेने टाटा सन्सचे एक पाऊल गुरुवारी पडले. टाटा सन्स लिमिटेडला खासगी कंपनी करण्याच्या प्रस्तावाला भागधारकांनी गुरुवारी बहुमताने मंजुरी दिली.

ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष व समूहातील कंपन्यांच्या संचालकपदावरून दूर करण्यात आलेल्या मिस्त्री यांचा १०० अब्ज डॉलरच्या टाटा सन्समध्ये १८.४ टक्के हिस्सा आहे. टाटाशी संबंधित काही विश्वस्त संस्थांनंतर (६६ टक्के) मिस्त्री हे समूहात दुसरे मोठे भागीदार आहे.

मिस्त्री यांचा हिस्सा कमी करण्यासाठी तो अन्य भागीदारांना देण्यासाठी समूह आग्रही आहे. मात्र सध्याच्या नियमानुसार मिस्त्री हा हिस्सा समूहाबाहेरील व्यक्ती तसेच कंपन्यांना विकू शकतात. त्याला पायबंद बसावा यासाठी टाटा सन्सच्या नियमांमध्ये बदल करण्यासह कंपनी खासगी (प्रायव्हेट लिमिटेड) करण्याचा निर्णय भागधारकांच्या मुंबईतील गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी ७५ टक्के भागधारकांच्या पसंतीची आवश्यकता असताना हा निर्णय बहुमताने मंजूर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मिस्त्री यांनी टाटा सन्स लिमिटेडचे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिडेट असे रूपांतर करण्यास विरोध दर्शविला होता.

मिस्त्री यांच्या गेल्या वर्षी झालेल्या हकालपट्टीनंतर रतन टाटा यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषविले होते. तर जानेवारी २०१७ मध्ये समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांची समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

टाटा समूहातून अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर मिस्त्री यांनी दुसऱ्याच दिवशी समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्वस्तांना लिहिलेल्या इ-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती.

यानंतर हे पत्र समाजमाध्यमांमधून प्रसारित झाले. याबाबत टाटा समूहाच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीपत्रक जारी करत मिस्त्रींवर तोंडसुख घेतले होते.

प्रा. लि. ते प्रा. लि. द्वारा लिमिटेड..

एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीच्या भागधारकांना आपला हिस्सा अन्य कोणालाही विकता येतो. मात्र प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागधारकांना आपला हिस्सा कंपनी अंतर्गत भागधारकांनाच विकणे बंधनकारक आहे. त्यामुळे नव्या बदलाप्रमाणे टाटा सन्स लिमिटेड आता टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड होत आहे. १९१७ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड म्हणून अस्तित्वात आलेली टाटा सन्स १९७५ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी बनली होती. तत्पूर्वी, १९६५ मध्ये मिस्त्री कुटुंबीयांचा हिस्सा खरेदीमार्फत समूहात शिरकाव झाला होता.