‘बल्लारपूर’च्या पत घसरणीचा परिणाम

कितीही आणीबाणीची परिस्थिती आली तरी लिक्विड फंडातील गुंतवणुकीवर नुकसान होत नाही असा समज गुरुवारी टॉरस म्युच्युअल फंडाच्या सर्वच निश्चित उत्पन्न देणाऱ्या फंडांनी खोटा ठरविला. फंडाच्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजनांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात गत दोन दिवसांत ७ ते १२ टक्के घट दिसून आली.

मागील वर्षी जून महिन्यात जेएसडब्यू स्टील व ऑक्टोबर महिन्यात अ‍ॅम्टेक ऑटोच्या रोख्यांची पत आघाडीच्या पतनिर्धारण संस्थांनी कमी केल्याने रोखे गुंतवणूकदारांना जबर नुकसान सहन करावे लागले होते. याची दखल घेऊन सेबीने रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांसाठी नियमावली निश्चित केली होती. आजच्या या घटनेनंतर या नियमांचा फोलपणा पुन्हा अनुभवण्यास मिळाला.

‘इंडिया रेटिंग्ज’ या पत निश्चित करणाऱ्या संस्थेने कागद निर्मिती उद्योगात असलेल्या बल्लारपूर इंडस्ट्रीजच्या रोख्यांची पत खालावल्याने टॉरस म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या योजनांचे मालमत्ता मूल्य ७ ते १२ टक्क्यांनी घटले. टॉरस डायनॅमिक बाँड फंड व टॉरस अल्ट्रा शॉर्ट टर्म या दोन योजनांनी बल्लारपूर इंडस्ट्रीजच्या रोख्यांत सर्वाधिक गुंतवणूक केली होती. सेबीच्या नियमानुसार एका कंपनीच्या रोख्यात सर्वाधिक १० टक्के व विश्वस्तांच्या परवानगीने कमाल १२ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. टॉरस म्युच्युअल फंडाने या कमाल मर्यादेपर्यंत गुंतवणूक केली होती. सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या रोख्यांची पत कमी झाल्याने टॉरस म्युच्युअल फंडाच्या या योजनांचे मूल्य कमी झाले.

समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड व्यवस्थापकाला अधिक सजग असावे लागते. रोखे गुंतवणुकीत परतावा एका आकडय़ात असल्याने झालेले नुकसान सुधारण्यास कमी वाव असतो, असे एलआयसी म्युच्युअल फंडाच्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांचे निधी व्यवस्थापक मर्झबान इराणी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. अनेक गुंतवणूकदार फंडाच्या गुंतवणुका न पाहता केवळ परताव्याचा दर पाहून मुख्यत्वे ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करणारे असतात. म्युच्युअल फंडांनी डायरेक्ट प्लान विकावे म्हणून सेबी आग्रही असली तरी टॉरस म्युच्युअल फंडाच्या बाबतीत जो प्रसंग घडला त्यातील धोके लक्षात घेणे गरजेचे आहे. जो गुंतवणूकदार एखाद्या गुंतवणुकीतील जोखीम समजतो त्यालाच थेट गुंतवणूक करण्याची मुभा असायला हवी. गुंतवणूकदार साक्षरता वाढविणे गरजेचे आहे, असे सीडीएसएलच्या गुंतवणूक साक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे यांनी सांगितले.