टॉरस म्युच्युअल फंडाचा गुंतवणूकदारांना धडा!

मागील आठवडय़ात पतमानांकन कंपन्यांनी बल्लारपूर इंडस्ट्रीजच्या (बिल्ट) रोख्यांची पत कमी केल्यामुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या एनएव्हीत सलग दोन दिवसांत ७ ते १२ टक्के घसरण झाली. या घसरणीमुळे नुकसान झालेल्या टॉरस म्युच्युअल फंडामुळे गुंतवणूकदारांपैकी ७५ टक्के गुंतवणूक डायरेक्ट प्लान अर्थात मध्यस्थाला वगळून गुंतवणूक करणाऱ्यापैकी असल्याचे समोर आले आहे.

सध्या कार्यरत असलेल्या सर्व म्युच्युअल फंडाच्या योजनांत एकूण गुंतलेल्या मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्ता ही डायरेक्ट प्लानमधील आहे. त्या तुलनेत टॉरस म्युच्युअल फंडातील नुकसान झालेल्या या योजनेत सरासरी ७५ टक्के गुंतवणूक थेट पद्धतीने कोणत्याही मध्यस्थाविना अर्थात डायरेक्ट प्लानमधून आल्याचे समोर आले आहे. या कलंकित फंडांच्या गुंतवणूकदारांपैकी ७० टक्के गुंतवणूक ही व्यक्तिगत नव्हे तर बँका आणि कंपन्यांची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. बाधित गुंतवणूकदारांपैकी ७.७ टक्के गुंतवणुकदार वैयक्तिक गुंतवणूकदारांची असल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वसाधारणपणे बँका व कंपन्या त्यांच्या गुंतवणुका थेट करीत असतात.

‘रोखे म्युच्युअल फंड समजण्यास गुंतागुंतीचे असतात. रोखे म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार प्रामुख्याने दोन प्रकारच्या जोखमींचा सामना करीत असतो. पहिली असते रोख्यांची पत व दुसरी असते मुदतपूर्ती. पहिल्या प्रकारची जोखीम वेळेवर व्याज व मुदतपूर्तीनंतर मुद्दल मिळण्याची तर दुसऱ्या प्रकारची जोखीम ही भांडवली वृद्धींशी संबंधित जोखीम असते. समभाग गुंतवणुकीपेक्षा रोखे गुंतवणूक जटील असल्याने पत व मुदतपूर्ती यांची समतोल साधणारा रोखे म्युच्युअल फंड कोणता हे गुंतवणूकदारांना समजणे कठीण असते,’ असे फंड्स इंडियाच्या विद्या बाला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

‘सामान्य गुंतवणूकदाराची मानसिकता ही पैसे वाचविण्याची असते. इंग्रजीत ‘पेनी वाईज पौंड फुलीश’ अशी म्हण आहे. वैयक्तिक गुंतवणूकदार एक पैसा वाचवायला जातात आणि बंदा रुपया गमावून बसतात. समभाग व रोखे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी स्वत: पैसे खर्चून सल्ला घेणे अथवा विक्रेत्यामार्फत विकल्या जाणाऱ्या रेग्युलर प्लानमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मागील वर्षभरात अशा प्रकारच्या तीन घटना घडलेल्या असल्याने गुंतवणूकदारांनी योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे, असे अ‍ॅसेटव्हिला फायनान्शियल अ‍ॅडव्हायजर्सच्या जयप्रकाश मौर्या यांनी सांगितले.