भारतीय दूरसंचार क्षेत्रात स्थानिक भागीदारांच्या सहकार्याने व्यवसाय करण्याचा नॉर्वेच्या टेलिनॉरचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला आहे. कंपनीने यूनिनॉरवर १०० टक्के वर्चस्व मिळविण्याचे निश्चित केले असून सहयोगी कंपनी लक्षदीप इन्व्हेस्टमेन्टला त्यापोटी रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे.
येथील दूरसंचार व्यवसाय स्वतंत्रपणे हाताळण्यास उत्सुकता दाखविणारी टेलिनॉर ही तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी ब्रिटनच्या वोडाफोन व रशियाच्या सिस्टेमाने स्थानिक भारतीय कंपनीत १०० टक्के हिस्सा पादाक्रांत केला आहे. पैकी वोडाफोनमधून पिरामल एन्टरप्राइजेस बाहेर पडली आहे. तर एमटीएस नाममुद्रेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्या सिस्टेमापासून श्याम टेलिकॉमने फारकत घेतली आहे.
मूळच्या नॉर्वेच्या टेलिनॉरबरोबर सध्या लक्षदीपची २६ टक्क्यांच्या हिश्शांसह भागीदारी आहे. तर उर्वरित सर्व ७४ टक्के हिस्सा टेलिनॉरकडे आहे. उभय कंपन्यांमार्फत यूनिनॉर या नाममुद्रेअंतर्गत दूरसंचार सेवा भारतात पुरविली जाते. टेलिनॉरने आता लक्षदीपकडील २६ टक्के हिस्सा ७८० कोटी रुपयांना खरेदी करण्याचे ठरविले आहे.
टेलिनॉरने यासाठी विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे अर्जही सादर केला असल्याची माहिती कंपनीच्या मुंबईतील सूत्रांनी दिली. उर्वरित हिस्सा खरेदी करण्यासाठी तसेच यूनिनॉरमध्ये १०० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा वाढविण्यासाठीची परवानगी यात मागितल्याचे सांगण्यात आले. लक्षदीप इन्व्हेस्टमेन्ट ही सन फार्मास्युटिकल्सचे संचालक सुधीर वालिया यांची गुंतवणूक कंपनी आहे. भागीदारीतील व्यवसायासाठी टेलिविंग्ज कम्युनिकेशन्स ही कंपनीही स्थापन करण्यात आली होती. टेलिनॉरची यापूर्वीची भागीदारी यूनिटेक या बांधकाम क्षेत्रातील कंपनीबरोबर होती. मात्र २०१२ मधील टुजी ध्वनिलहरी परवाने घोटाळ्यानंतर उभय कंपन्यांमध्ये काडीमोड झाला होता.
२००८ पासून भारतात अस्तित्व असलेल्या या कंपनीचे जाळे आणि वितरण पायाभूत क्षेत्र ३० टक्क्याने विस्तारण्यासाठी कंपनीने गेल्याच वर्षी ५०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा टेलिनॉरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिग्वे ब्रेके यांनी केली होती. महाराष्ट्रासह (मुंबई वगळता) देशातील सहा परिमंडळात कंपनीचे सध्या देशभरात ३ कोटींहून अधिक मोबाइलधारक आहेत. काही महिन्यांपूर्वीच आपले परिमंडळ क्षेत्र कमी करत कंपनीने निवडक क्षेत्रातच सेवा देण्याची योजना अमलात आणली.