नवीन ग्राहक मिळविण्यात खासगी कंपन्यांचा वरचष्मा
देशातील दूरध्वनीधारकांची संख्या १००.६९ कोटींपर्यंत पोहोचली आहे. जूनअखेर हा पल्ला गाठल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.
दूरध्वनीधारकांच्या संख्यावाढीत खासगी कंपन्यांचा हिस्सा महत्त्वाचा राहिल्याचे निरिक्षण नोंदवितानाच त्यांचे प्रमाण ग्राहकसंख्येबाबत ९१.७५ टक्के राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर भारत संचार निगम लिमिटेड व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांचा बाजारहिस्सा अवघा एकूण ८.२५ टक्के आहे.
मे २०१५ मध्ये १००.२० कोटी दूरध्वनीधारक असलेल्यांची संख्या जूनमध्ये वाढली आहे. यामध्ये जीएसएम व सीडीएमए तंत्रज्ञानावरील दूरध्वनीधारकांची संख्या ०.५१ टक्क्य़ाने वाढून ९८.०८ कोटी ढाली आहे. तर फिक्स लाईन धारकांची संख्या घसरून २.६१ कोटी झाली आहे.
जूनअखेर शहरी भागातील बिगर जोडणी (वायरलेस) नोंदणी वाढून ५६.२९ कोटी झाली आहे. तर जोडणी असलेल्या धारकांची संख्या वाढून ४१.७८ कोटी झाले आहे. राज्यांमध्ये पश्चिम बंगालने सर्वाधिक वाढीची नोंद केली आहे. तर उत्तर प्रदेश (पूर्व), जम्मू आणि काश्मिर, तामिळनाडू भागातील दूरध्वनीधारकांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे.
जूनमध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी एकूण ३६.८० लाख दूरध्वनीधारकांनी अर्ज केले होते.
मोबाइल कंपन्यांमध्ये एअरटेलचे २३.०६ कोटी, व्होडाफोनचे १८.५३ कोटी, आयडियाचे १६.२० कोटी, रिलायन्सचे १०.९९ कोटी, टाटाचे ६.१५ कोटी, एअरसेलचे ८.३० कोटी, यूनिनॉरचे ४.८१ कोटी, सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसचे ८६.९६ लाख व व्हिडिओकॉनचे ७६.१० लाख मोबाइलधारक जूनअखेर राहिले आहेत. बीएसएनएल व एमटीएनएलच्या मोबाइलधारकांची संख्या अनुक्रमे ७.७३ कोटी व ३५.४७ लाख राहिली आहे.
ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या जूनअखेर वाढून १०.४९ कोटी झाली आहे. यामध्ये आघाडीच्या पाच कंपन्यांचा बाजारहिस्सा ८३.८३ टक्के आहे. त्यात भारती एअरटेल (२.४५ कोटी), व्होडाफोन (२.२० कोटी), बीएसएनएल (१.८२ कोटी), आयडिया सेल्युलर (१.६६ कोटी), रिलायन्स कम्युनिकेशन्स (९७.४० लाख) यांचा समावेश आहे.