तोटय़ातील वित्तीय निष्कर्षांत त्रुटी राहिल्याबद्दल टेस्को या ब्रिटनमधील सर्वात मोठय़ा रिटेल कंपनीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये कंपनीने नफा फुगवून दाखविला होता. टेस्कोने चालू पहिल्या अर्धवार्षिकात नफा २६.३ कोटी पौंडने अधिक दाखविला आहे.
कंपनीने दोन वर्षांपूर्वीही ताळेबंदात अनियमता नोंदविली होती. त्यानंतर प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या यंदाच्या निकालांमध्येही आकडय़ांचे फेरफार करण्यात आले. ताज्या प्रकरणात स्वत:वर जबाबदारी घेत कंपनीचे अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॉडबेन्ट यांनी राजीनामा दिला.
कंपनीच्या वित्तीय प्रवासाबाबत व्यवस्थापनाने त्वरित निर्णय घेतला असून नवे व्यवस्थापन पुढील कार्यवाही करेल, असेही रिचर्ड यांनी स्पष्ट केले आहे. महिन्याभरापूर्वीच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या डेव्ह लेव्हिस यांनी त्यावेळी रिचर्ड यांच्या सेवामुक्ततेबाबतच्या वृत्ताचा इन्कार केला होता.
रिचर्ड हे टेस्कोच्या संचालक मंडळात जुलै २०११ मध्ये रुजू झाले होते. त्यानंतर चारच महिन्यात ते कंपनीचे अध्यक्षही बनले. टेस्कोला संकटातून न वाचविल्याबद्दल रिचर्ड यांनी आधीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर टीका केली होती. कंपनीचा ताळेबंद डेलॉइटने तपासला असून त्यावर आता ब्रिटनच्या वित्तीय नियामकाकडून नजर फिरविली जात आहे.
टेस्को भारतासह अन्य देशांमध्येही दालन शंृखला विस्तारण्याच्या तयारीत आहे.
ब्रिटनमधील ‘सत्यम’ घोटाळा; टाटा समूह सावध
मुंंबई : भारतात किरकोळ विक्री (रिटेल) क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा विस्तारल्यानंतर टेस्कोने टाटा समूहाबरोबर व्यावसायिक संबंध विस्तारण्याची तयारी दाखविली होती. ब्रिटनच्या या कंपनीतही ‘सत्यम’ घोटाळा झाल्याने आता या प्रवासाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टेस्को ही जगातील तिसरी मोठी रिटेल कंपनी आहे. टाटा समूहामार्फत रिटेल क्षेत्रातील व्यवसायात टेस्कोने रस दाखविला होता.