धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधाही

गुजरातमधील विमान उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अहमदाबादमध्ये देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करण्याची योजना आखली आहे. या नगरीमध्ये धावपट्टी, प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड आणि छोटय़ा उत्पादन विभागासह अन्य सुविधांचा समावेश असेल.

सरकारी मालकीच्या गुजरात राज्य हवाई पायाभूत सुविधा कंपनी लि.च्या (जीयूजेएसएआयएल) अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी, व्यावसायिक, राज्यकर्ते आणि बडे उद्योगसमूह यांच्यात हवाई क्षेत्रातील असलेल्या क्षमतेबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही विमान उद्योग नगरी उभारण्यात येणार आहे. सदर कंपनीने यासाठी बगोदरा गावातील एक भूखंड निश्चित केला आहे. गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि जनतेमध्ये या क्षेत्राबाबत जागृती करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅ. अजय चौहान यांनी सांगितले. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच नगरी आहे, जगभरात केवळ तीन ते चार अशा प्रकारच्या नगरी अस्तित्वात आहेत. बगोदरा येथे ६० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली असून आता या प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळणी करण्यात येणार आहे, असेही चौहान म्हणाले.