सध्या सरासरीपेक्षा कमी असला तरी पावसाळा लांबण्याची शक्यता व त्यामुळे आधीच्या अपेक्षेपेक्षा ‘बरे’ पीकपाणी येण्याची शक्यता आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुढील आठवडय़ात होत असलेली एकूण १५ हजार कोटींची रोखेविक्री यामुळे ८.८३ टक्के व्याज देय असलेल्या व २५ नोव्हेंबर २०१३ रोजी मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांचा परताव्याचा दर शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या रोखे व्यवहार मंचावर कामकाजाचे सत्र बंद होताना ८.७७ टक्के नोंदला गेला. शुक्रवारच्या कामकाजाच्या काळात त्याने ८.७० टक्के असा वार्षिक नीचांकही गाठला.
‘‘सोमवारी रिझव्‍‌र्ह बँक नवीन रोखे विक्रीचे वेळापत्रक जाहीर करेल व नंतरच्या शुक्रवारी रोख्यांची विक्री होईल. बाजारात २०२४ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांची विक्री रिझव्‍‌र्ह बँक करेल व नवीन दहा वर्षांचे रोखे तुलनेसाठी उपलब्ध होतील. याचा विचार करून नवीन रोखे खरेदी करण्यासाठी अनेक निधी व्यवस्थापकांनी रोकड सुलभता केली आहे,’’ अशी या संबंधाने कारणमीमांसा करताना, बरोडा पायोनियरचे निधी व्यवस्थापक अलोक साहू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सरकारी रोख्यांच्या एक वर्ष व्याजदराचे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार ८.३९ टक्क्यांवर होताना शुक्रवारी दिसले.