खासगी क्षेत्रातील एचडीएफसी लिमिटेड व एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या चर्चेनंतर आता देशातील दोन सार्वजनिक बँकांभोवती अशीच चर्चा सुरू झाली आहे. युनायटेड बँक ऑफ इंडियाला आपल्यात विलीन करून घेण्याबाबत आयडीबीआय बँक उत्सुक असल्याचे वदंतेचे वारे जोराने घोंघावू लागले आहेत.
गेल्या आठवडय़ात चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर होत असतानाच देशातील खासगी वित्तीय क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्यातील एकत्रीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या या दोन्ही वित्तकंपन्यांना तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले होते.असाच काहीसा किस्सा आता देशातील चर्चेतील दोन सार्वजनिक बँकांबाबत घडत आहे. आयडीबीआय बँकेच्या संचालक मंडळात युनायटेड बँक ऑफ इंडियाला विलीन करून घेण्याबाबतचा प्रस्ताव आल्याची चर्चा सोमवारी जोर धरू लागली. अखेर युनायटेड बँक ऑफ इंडियाने मुंबई शेअर बाजाराला अद्याप याबाबत काहीही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करावे लागले.
युनायटेड बँक ऑफ इंडिया ही कोलकत्तास्थित सार्वजनिक बँक असून काही महिन्यांपूर्वीच ती वाढत्या थकीत कर्जामुळे चर्चेत आली होती. तोटय़ातील किंगफिशर एअरलाइन्सला मोठय़ा प्रमाणात कर्जे दिलेल्या या बँकेच्या ताळेबंदामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर वाढीव पद्धतीने आकडे जारी केल्याचेही स्पष्ट झाले होते. युनायडेट बँकेच्या तत्कालीन महिला अध्यक्षाने यानंतर स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. बँकेत सध्या सरकारचे ८९.४७ टक्के भागभांडवल आहे. तर खासगी बँकांची वाढती स्पर्धा लक्षात घेत आपल्या रूप, कार्यात बदल करणाऱ्या आयडीबीआय बँकेत ७६.५० टक्के हिस्सा केंद्र सरकारचा आहे. या बँकेनेही त्वरित सोमवारी प्रसिद्धीपत्रक काढत विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत सरकारकडून सूचना आल्याचाही उभय बँकांनी इन्कार केला आहे.विलीनीकरणाच्या चर्चेमुळे युनायटेड बँक ऑफ इंडियाचा समभाग व्यवहारात तब्बल १०.२ टक्क्यांनी उसळत ५४ रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर तो शुक्रवारच्या तुलनेत ४.८० टक्क्यांनी वधारत ५१.३५ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात आयडीबीआय बँकेचा समभागदेखील दिवसअखेर ०.११ टक्क्यांनी वधारत ९०.३० वर स्थिरावला.