वस्तू बाजारमंच ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि. (एनएसईएल)’मधील ५,६०० कोटी रुपयांची देणी थकविली गेल्याच्या प्रकरणात आणखी तीन बडय़ा दलालांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. गजाआड झालेल्यांमध्ये इंडिया इन्फोलाइन, आनंद राठी कमॉडिटीज् आणि जिओफिन कॉमट्रेडच्या दलालांचा समावेश आहे.
जिग्नेश शाह प्रवर्तित फायनान्शिय टेक्नॉलॉजीजची मालकी असलेल्या एनएसईएलमधील घोटाळा उघडकीस आल्यापासून, गेल्या सुमारे दीड वर्षांपासून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. पण प्रथमच बडय़ा दलालांच्या सहभागाला अधोरेखित करीत त्यांचे अटकसत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आनंद राठी कमॉडिटीज्चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रख्यात दलाल आनंद राठी यांचे पुत्र अमित राठी, इंडिया इन्फोलाइन कमॉडिटीज् व्हाइसचे अध्यक्ष चिंतन मोदी आणि जिओफिन कॉमट्रेडचे पूर्णवेळ संचालक सी. पी. कृष्णन यांना कोची (केरळ) येथून अटक करण्यात आली. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने या दलाल पेढय़ांच्या बडय़ा अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते.
या मंडळींनी एनएसईएल या स्पॉट एक्स्चेंजमधील जिनसांची विक्री ही एक गुंतवणूक साधन या रूपात करून त्यावर निश्चित स्वरूपाच्या लाभाचे प्रलोभन देत मोठी रक्कम गुंतवणूकदारांकडून उभी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. आपल्या गुंतवणूकदार ग्राहकांच्या संकेतांकांचा अनेकवार चलाखीने गैरवापर करीत, बेकायदेशीर रीतीने चक्रांकित व्यवहार करून उखळ पांढरे करून घेतल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांची व्यवहारपूर्ततेपश्चात ५,६०० कोटींची देणी थकल्याचे उघडकीस आल्यानंतर, कारवाई म्हणून एनएसईएलवरील व्यवहारांवर प्रथम बंदी आणली गेली आणि नंतर हा बाजारमंचच गुंडाळण्यात आला. प्रवर्तक म्हणून जिग्नेश शाहसह एनएसईएलमध्ये कार्यरत विविध अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी तपासानंतर अटक केली होती.
एनएसईएल त्रस्त गुंतवणूकदारांकडून स्थापित करण्यात आलेल्या मंचाद्वारे या घोटाळ्यात दलालांच्या सहभागाचाही तपास केला जावा, अशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे निवेदन देऊन मागणी केली होती. सुमारे २०० दलालांचा संघ या प्रकरणात गैरव्यवहार करण्यात सक्रिय होता असा या मंचाचा आरोप आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्या दलाल पेढय़ांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यांनी अधिकृतपणे आपली प्रतिक्रियाही कळविलेली नाही.