रिलायन्सने जिओफोनची घोषणा केल्यानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध दूरसंचार सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये कमालीच मूल्यघसरण सप्ताहअखेरच्या व्यवहारात नोंदली गेली. स्पर्धक कंपन्या ३ टक्क्यांपर्यंत घसरल्या असताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मूल्य मात्र जवळपास ४ टक्क्यांनी वाढले. कंपनीने गुरुवारी नोंदविलेला वाढीव नफा तसेच शुक्रवारी जाहीर केलेला लाभांश याचेही पडसाद समभाग उंचावण्यावर पडले. गेल्या वर्षी जिओ योजना सादर केल्यानंतर कंपनीचे भागधारक २ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.

फुटक फोन, लाभांश, बोनस, वाढीव तिमाही वित्तीय निकाल अशा एका मागोमागच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या घोषणांच्या जोरावर सप्ताहअखेरच्या सत्रात भांडवली बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने निघाले. १२४.४९ अंश वाढीसह सेन्सेक्स ३२,०२८.८९ वर पोहोचला, तर ४१.९५ अंश वाढीमुळे निफ्टी ९,९१५.२५ पर्यंत स्थिरावला.

* रिलायन्स इंडस्ट्रीज        रु. १,५८६.२०  २ ३.७६%

* आयडिया सेल्युलर        रु. ९१.९०     ३ ३.११%

* भारती एअरटेल          रु. ४११.१५    ३ २.०५%

* रिलायन्स कम्यु.         रु. २४.२५     ३ ०.८२%

साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्सने अवघ्या ८.१४ अंश तर निफ्टीने तुलनेत अधिक २८.९० अंश वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्सने गुरुवारी ५०.९५ अंश घसरण नोंदविली होती, तर शुक्रवारी निफ्टीचा प्रवास ९,९२४.७० पर्यंत झेपावला होता. रिलायन्सबरोबरच विप्रो, इंडियन बँकेच्या तिमाही निकालावर बाजाराने तेजीची प्रतिक्रिया दिली.