‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’ तसे ‘फसवणाऱ्याने फसवीत जावे आणि आपण फसवून घेत जावे’ अशी ही परिस्थिती सध्या ‘आर्थिक साक्षरता’ या क्षेत्रात राजरोस सुरू आहे. यांचे तथाकथित आíथक साक्षरता मेळावे म्हणजे उपस्थित श्रोत्यांचा प्रत्येकी दीड तास वाया घालवणारा ठरत आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी शाहीर साबळे यांचे ‘आंधळं दळतंय’ नावाचे एक लोकनाटय़ तुफान गाजले होते. त्या वेळच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारा तो कार्यक्रम होता. याची आठवण व्हायचे कारण म्हणजे नुकताच मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेला ‘शेअर्समधील गुंतवणुकीतून पशाचे नियोजन कसे करावे’ या विषयावरील तथाकथित आíथक साक्षरता मेळावा! आíथक साक्षरता कार्यक्रमाची ऐशी तशी असे म्हणावे लागेल अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम म्हणजे उपस्थित श्रोत्यांचा प्रत्येकी दीड तास वाया घालवणारा ठरला. भारत सरकारच्या सूचनेनुसार सर्वत्र अशा प्रकारची व्याख्याने आयोजित करून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा निखळ हेतू आहे सरकारचा. अर्थात प्रत्येक ठिकाणी सरकारला हे सर्व स्वत: करणे शक्य नसल्याने संबंधित संस्था म्हणजेच स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरिज, स्टॉक ब्रोकर्स, बँका इत्यादी संस्थांवर ही जबाबदारी सोपवली आहे आणि सीडीएसएलसारख्या अनेक संस्था ती योग्य प्रकारे पार पाडत आहेत. गेल्या महिन्यात ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने बोरिवली येथे सीडीएसएलने आयोजित केलेल्या माझ्या व्याख्यानाला इतकी उपस्थिती होती की प्रबोधनकार ठाकरे सभागृह भरून गेलेच, पण अनेक जणांना प्रवेश न मिळाल्याने परत जावे लागले. त्यांच्यासाठी परत एकदा तोच कार्यक्रम त्याच ठिकाणी चार दिवसांपूर्वी मी सादर केला होता. केवळ तात्त्विक चर्चा असे स्वरूप राहू नये म्हणून विनोद शर्मा या अमराठी तज्ज्ञाने उपस्थित श्रोत्यांना गुंतवणुकीचे अनेक मार्ग, गुंतवणूक कुठे करावी, बाजाराची दिशा कशी ओळखावी याबाबत सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. कुणी विचारेल की मुंबईत तज्ज्ञ मंडळी नाहीत का? मग विनोद शर्माना अहमदाबादमधून बोलवायची गरज काय? याचे उत्तर असे आहे की, न बोलावताच स्वखर्चाने येण्याची तयारी दाखवणारा हा माणूस. केवळ ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून एक चांगले काम चालले आहे त्यात आपलाही काही हातभार असावा ही त्यांची इच्छा.
वर ज्या मध्य मुंबईतील कार्यक्रमाचा उल्लेख केला तो बहुधा संबंधित संस्थेने ‘आऊटसोर्स’ केला असावा! कारण जो कुणी वक्ता होता त्याने शेअर बाजारावर दहा मिनिटेदेखील न बोलता बँकेतील मुदत ठेव, रिकिरग डिपॉझिट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरच दळण दळत दीड तास अक्षरश: फुकट घालवला. डोंबिवलीसारख्या लांबच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांवर तर हा अन्यायच होता. शंभर रुपयावर एक वर्षांनंतर १० टक्के या दराने १० रुपये व्याज म्हणजे एकूण रक्कम ११० होतात. पुढील वर्षी ११० रुपयांवर १० टक्के व्याज मिळणार यालाच चक्रवाढ व्याज म्हणायचे ही बाब हा वक्ता २५ मिनिटे ‘समजावून’ सांगत होता. जणू काही समोरील श्रोते दुसरीतले विद्यार्थी आहेत. शिवाय अधूनमधून ‘मी ही जी काही महत्त्वाची माहिती सांगतो आहे ती लिहून घ्या’ असा उपदेश चालू होताच. इतकी उथळ माहिती ‘शेअर बाजाराविषयी व्याख्याना’त देणे म्हणजे दांभिकपणाचा कळस झाला. ज्या संस्थेने कार्यक्रमाचे आयोजकत्व आणि प्रायोजकत्व घेतले होते त्यांनी उपस्थित श्रोत्यांचा नाश्ता-चहाचा खर्च केला. वक्त्याला मानधन मिळाले. ज्या संस्थेने हा सर्व घाट घालून व्यवस्थापन केले त्यांना ‘कार्यक्रम पार पडला’ हे समाधान. पुन्हा सेबीच्या दरबारात नोंद झाली की आíथक साक्षरता कार्यक्रम आम्ही आयोजित केला. कोण वक्ता आपण बोलवत आहोत, त्याची क्षमता काय, केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर समजावून सांगण्याची संभाषण कला (इथे तर दोन्ही नव्हते) याचा विचार कुणी करायचा? श्रोत्यांच्या वेळेची काही किंमत आहे की नाही? माझा प्रत्येक कार्यक्रम अक्षरश: ठरलेल्या वेळात सुरू होतो अगदी एक मिनिटदेखील विलंब नसतो. ही श्रोत्यांशी असलेली बांधीलकी आहे.  वरील कार्यक्रम तब्बल एक तास उशिराने सुरू झाला. बरे पदरात काय पडले तर एक मोठे शून्य! अशा परिस्थितीत लोकांनी कार्यक्रमांकडे पाठ फिरवली तर त्यांचा दोष नाही. आजकाल अनेक संस्था अशा आहेत की आपण कुणाला बोलावतो त्याची नीट चौकशीदेखील करीत नाहीत. एका प्रख्यात संस्थेने काही वर्षांपूर्वी एका महाभागाकडे आपल्या शेअर बाजार प्रशिक्षण वर्गाचे काम सोपवले होते. लोकांना रिपोर्ट बनवून देणाऱ्या या संस्थेने प्रस्तुत महाभाग खरेच शेअर बाजारातील तज्ज्ञ आहे का याची माहिती करून घेण्याची तसदी घेतली नव्हती. केवळ तो सांगतो म्हणून हे महाभाग स्वत: सर्जन आहे असे सांगत होते. पहिली टेस्ट टय़ूब बेबी मी जन्माला घातली असेही सांगत असत. ज्योतिषशास्त्रात आपला हात कुणी धरणार नाही हेही सांगत. त्यामुळे अमुक नक्षत्रावर अमुक शेअर घेतला की तो वाढणारच याची खात्री देत! माझ्या दोन मर्सडिीज गाडय़ा आहेत असे सांगणारा हा माणूस एसटीने प्रवास करताना अनेकांनी पाहिला होता. ‘फॉरिन एक्सचेंज’ हा विषय म्हणे याचा हातचा मळ आणि महत्त्वाचे म्हणजे यांना फोन करायचा कधी तर म्हणे रात्री दोन ते तीन या वेळात! यात काडीमात्र अतिशयोक्ती नाही.
कारण हे सर्व मी स्वत: ऐकले आहे. याचे कारण त्यानंतर अनेक सत्रांत माझी व्याख्याने मी विनामूल्य दिली होती. तात्पर्य ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’ तसे ‘फसवणाऱ्याने फसवीत जावे आणि आपण फसवून घेत जावे’ अशी ही परिस्थिती. ‘लोकसत्ता’ पुरस्कृत आमच्या कार्यक्रमांना अक्षरश: ७००- ८०० अशा संख्येने श्रोते परत परत येतात त्याचे गमक काय हे वेगळे सांगायला नको. ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला त्या कार्यक्रमात श्रोते खरोखरच सज्जन होते. नाही तर त्यांनी कार्यक्रम उधळून लावला असता. असो. भारत सरकारकडे कल्ल५ी२३१ ढ१३ीू३्रल्लो४ल्ल िआहे त्यातून हे सर्व चाललेले असते म्हणून खंत वाटते. कारण हा शेवटी जनतेचा पसा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time to bridge financial literacy gap
First published on: 26-04-2014 at 01:12 IST