डिजिटल बँकिंगच्या नव्या पर्वात २१ बँका सहभागी

सहकार क्षेत्रातील अग्रणी, बहुराजीय टीजेएसबी बँकेला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे विकसित एकीकृत देयक प्रणालीवर (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस – यूपीआय) कार्यान्वयनाला मंजुरी दिली आहे.

एनपीसीआयने टीजेएसबी बँकेला या प्रणालीवर कामकाज करण्यासाठी मान्यता देऊन टीजेएसबी सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहर उमटवली आहे. अशी मान्यता मिळवणाऱ्या २१ बँकांपैकी टीजेएसबी बँक देशातील एकमेव सहकारी बँक ठरली आहे. टीजेएसबी बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त सेवेचा हा गौरव मानला जात आहे.

एकीकृत देयक मंच प्रणालीसाठी टीजेएसबी बँकेने विकसित केलेल्या ट्रान्सझ्ॉप अ‍ॅप हे गुरुपासून कार्यान्वित झाले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सी. नंदगोपाल मेनन यांनी दिली.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक आणि एनपीसीआयने टीजेएसबी सहकारी बँकेची निवड करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि स्वाभिमानाची बाब आहे, असेही मेनन यांनी म्हटले आहे.

बँकेच्या ग्राहकांना किमान ५० रुपयांपासून, १ लाख रुपयांपर्यंतची उलाढाल मोबाइल अ‍ॅपचा वापर करून, मित्र-आप्तेष्टांमध्ये, दुकानदार, अगदी फेरीवाले, रिक्षावाले यांना पैशांचे आदानप्रदान, खातेही नसलेल्या बँकेत पैशांचे हस्तांतरण विनासायास करता येईल; अशी ही बँकिंग सेवेत क्रांतिकारी बदल घडविणारी प्रणाली आहे, अशी प्रतिक्रिया टीजेएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

बँकेच्या ग्राहकांना टीजेएसबीच्या यूपीआय-समर्थ ‘ट्रान्सअ‍ॅप’वर एक वेळ फक्त ‘युनिक आयडी’ तयार करून पिन क्रमांक तयार करावा लागेल. आजवर रोखीत होत असलेल्या जवळपास सर्वच  छोटी-मोठी उलाढाल केवळ मोबाइलवरील एका क्लिकसरशी त्वरित व पूर्ण सुरक्षिततेने शक्य होईल, अशी माहिती साठे यांनी दिली. अगदी ई-कॉमर्सवरील ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्यायातही रोख रकमेऐवजी अ‍ॅपद्वारे पैशाचा भरणा ग्राहकांना करता येईल.

सुनील साठे म्हणाले, की यातून बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. याद्वारे रोकडरहित व्यवहार होणार आहेत. रोख व्यवहार न होता थेट खात्यातून पैशाची देवाण – घेवाण होणार आहे. या सर्व प्रणालीत सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

सर्व आर्थिक व्यवहार एका बोटावर!

  • घरातून बाहेर निघताना खिशात पैशाचे पाकिट घेण्याची गरज लागणार नाही. स्मार्टफोनच त्या पाकिटाचे काम करेल. भाजी, वाणसामान, रिक्षा, कॅब सर्व प्रकारची खरेदी यूपीआयद्वारे टीजेएसबीच्या ट्रान्सझप अ‍ॅपमधून होईल.
  • हे अ‍ॅप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. यासाठी टीजेएसबी बँकेत खाते असण्याची आवश्यकता नाही. ट्रान्सझप अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या सर्वाना याचा लाभ घेता येईल.
  • नोकरदार, गृहिणी, दुकानदार, छोटे व्यवसायिक – व्यापारी यांना या सेवेचा विशेष उपयोग होईल.
  • टीजेएसबी बँक एप्रिल २०१६ पासून ही प्रणाली अंगिकारण्यासाठी काम करत आहे. बँकेने केलेले सादरीकरण प्रभावी ठरल्याने एनपीसीआयकडून निवड झाली आहे.