देशाच्या निर्यातीत जूनमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात वाढ झाली आह़े  जूनमध्ये निर्यात वाढ १०.२२ टक्के नोंदविली गेली़  परंतु, याच काळात सोन्याच्या आयातीमध्येही भरमसाट वाढ झाल्यामुळे देशाची व्यापारी तूट ११.७६ अब्ज डॉलरने वाढली आह़े  निर्यातीत वाढ होत असताना सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यात आले असते, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ झाला असता़
जून महिन्यात निर्यातीत वाढ होण्यास अनेक क्षेत्रांनी हातभार लावला़  वस्त्रोद्योग(१४.३९ टक्के), खनिज पदार्थ(३८.३ टक्के), अभियांत्रिकी (२१.५७ टक्के), कातडय़ाचे पदार्थ (१५ टक्के), समुद्री पदार्थ(२७.४९ टक्के), तेलबिया(44.4 टक्के) आणि तंबाखू (३१ टक्के) या क्षेत्रांचा निर्यात वाढीत मोठा वाटा आह़े  यावर्ष जून महिन्यात २६.४७ अब्ज डॉलरची निर्यात भारताने केली़  गेल्या वर्षी याच महिन्यात निर्यातीचे प्रमाण २४.०२ अब्ज डॉलर इतके होत़े  परंतु, मे महिन्यापेक्षा जूनमधील निर्यात कमी होती़  मे महिन्यात निर्यात वाढीचे प्रमाण १२.४ टक्के होत़े  त्यातही जून महिन्यात व्यापारी तुटीचे प्रमाणही अधिक होत़े
वाढत्या बाजारपेठेत मागणीही वाढत आह़े  निर्यातीचे वाढते आकडे प्रोत्साहनात्मक आहेत आणि या वाढीत सातत्य राहील, अशी आम्हाला आशा आह़े  हे वित्तीय वर्ष गेल्या वर्षीपेक्षा चांगले होते, असे फिईओचे अध्यक्ष रफिक अहमद यांनी सांगितल़े
वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जून महिन्यात आयातीमध्येही ८.३३ टक्क्यांची वाढ झाली आह़े  मात्र रुपयाच्या ढासळत्या मूल्याचा निर्यातीवर सकारात्मक परिणाम दिसून येत आह़े  बुधवारीही रुपयाचे मूल्य १५ पैशांनी ढासळून ६०.२७ डॉलरवर आले होत़े  जूनमध्ये तेलाच्या आयातीत १०.९ टक्क्यांची (१३.३४ अब्ज डॉलर) वाढ झाली़  तर तेलइतर उत्पादनांच्या आयातीत ७ टक्क्यांची (२४.९ अब्ज डॉलर) वाढ नोंदविली गेली आह़े
दरम्यान, राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचे उत्तर देताना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सांगितले की, निर्यातीवर जागतिक मंदीचा विपरीत परिणाम झाला आह़े  परंतु, आता परिस्थिती हळूहळू सुधारत आह़े  २०११- १२ मध्ये भारताची निर्यात ३००.६ अब्ज होती़  २०१२-१३ मध्ये ती घसरून ३००.४ अब्ज डॉलर झाली़  २०१३-१४ मध्ये त्यात वाढ होऊन ती ३१३.५ अब्ज डॉलर झाली, अशी माहितीही सीतारामन् यांनी दिली़

जूनमध्ये सोन्याच्या आयातीत ६५ टक्के वाढ
सात महिन्यानंतर ३.१२ अब्ज डॉलरची आयात
सलग सात महिने खालावल्यानंतर जून महिन्यात सोन्याच्या आयातीत अचानक ६५.१३ टक्क्यांची मोठी वाढ झाली आह़े  या महिन्यात भारताने तब्बल ३.१२ अब्ज डॉलरचे सोने आयात केले आह़े  गेल्या वर्षी जून महिन्यात हेच प्रमाण केवळ १.८८ अब्ज डॉलर इतके कमी होत़े  या आयातीतून देशाची व्यापारी तूट ११.७६ अब्ज झाली आह़े  गेल्या वर्षी याच काळातील व्यापार तूट ११.२८ अब्ज डॉलर होती़
२०१३ च्या ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात अशीच ६२.५ टक्क्यांनी वाढली होती़  यानंतर चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी शासनाने सोन्या आयातीवर र्निबध लादले होत़े
२०१२-१३ मध्ये खनिज तेल आणि सोन्याच्या आयातीत भरमसाट वाढ झाल्यामुळे या कालावधीत चालू खात्यावरील तूट देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्क्यांपर्यंत वाढली होती़
चालू खात्यावरील तूट वाढल्यामुळे त्याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर पडत आह़े  त्यामुळे आयात महाग झाली आणि इंधनही महाग झाले होत़े