आठ महिन्यांच्या तळात पोहोचलेली निर्यात आणि मौल्यवान धातूची पुन्हा वाढलेली आयात यामुळे देशाची व्यापार तूट मोठय़ा प्रमाणात विस्तारली आहे. जुलैमध्ये ती ११.४४ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

गेल्या महिन्यात देशाची निर्यात २२.५४ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत ती यंदा ३.९४ टक्क्यांनी घसरली आहे. निर्यातीचा हा नोव्हेंबर २०१६ नंतरचा तळ आहे. मार्चमध्ये निर्यात २७.५९ टक्क्यांनी वाढली होती. मात्र यानंतर पुन्हा त्यात घसरण नोंदली गेली आहे. जुलैमधील घसरत्या निर्यातीवर औषधे, रत्ने व दागिने, तयार कपडे आदींची मागणी कमी झाल्याचा परिणाम झाला आहे.

जुलैमधील आयात १५.४२ टक्क्यांनी वाढताना ३४ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती २९.४५ अब्ज डॉलर होती. सोने तसेच खनिज तेलाच्या देशातील वाढत्या मागणीमुळे यंदा काळे व पांढरे सोने मोठय़ा प्रमाणावर आयात झाले आहे. गेल्या महिन्यात सोन्याची आयात तब्बल ९५ टक्क्यांनी वाढून २.१० अब्ज डॉलर झाली आहे. जुलै २०१६ मध्ये ती १.०७ अब्ज डॉलर होती, तर तेलाची आयात ७.८४ अब्ज डॉलपर्यंत झाली आहे. वार्षिक तुलनेत त्यात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

घसरती आयात व वाढती निर्यात यामुळे गेल्या महिन्यातील त्यातील दरी विस्तारत १२.९६ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही किमान तूट राहिली आहे.

अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम, रसायन आणि सागरी उत्पादनांबाबत गेल्या महिन्यात सकारात्मक प्रवास नोंदविला आहे. या कालावधीत त्यांची निर्यात वाढली आहे. निर्यातदारांची प्रमुख संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गेनायझेशन (फिओ) चे अध्यक्ष गणेश गुप्ता यांनी रत्ने, दागिने, औषधे, तयार कपडे यांची जुलैमधील घसरती निर्यात चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जुलै या पहिल्या चार महिन्यात निर्यात ८.९१ टक्क्यांनी वाढून ९४.७५ डॉलर झाली आहे, तर आयात २८.३० टक्क्यांनी वाढत १४६.२५ अब्ज डॉलरवर गेली आहे. परिणामी व्यापार तूट या दरम्यान ५१.५ अब्ज डॉलर झाली आहे.

सोने आयात दुप्पट

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये भारताची सोने आयात दुप्पट झाली आहे. एप्रिल ते जुलै २०१७ दरम्यान सोने आयात १३.३५ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

जुलैमध्ये मौल्यवान धातू आयात २.१० अब्ज डॉलर झाली आहे. जुलै २०१६ मध्ये ती १.०७ अब्ज डॉलर होती. परिणामी गेल्या महिन्यात व्यापार तूट वर्षभरापूर्वीच्या ७.७६ अब्ज डॉलरवरून ११.४४ अब्ज डॉलर झाली आहे, तर एप्रिल ते जुलै दरम्यान चालू खात्यातील तूट ४.९७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यानच्या द्विपक्षीय करारांतर्गत सोन्यावर मूळ सीमाशुल्क नसल्याने दक्षिण कोरियातून भारतात मोठय़ा प्रमाणात सोने आयात होत आहे. दक्षिण कोरियातून भारतात १ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ३३.८६ कोटी डॉलर राहिली आहे, तर २०१६-१७ दरम्यान ती ४७.०४ कोटी डॉलर होती. वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर सोन्यावरील १२.५ टक्के शुल्क रद्द करण्यात आले, तर नवीन कररचनेत सोन्यावरील आयात शुल्क ३ टक्के लागू झाले. चीननंतर भारत हा दुसरा मोठा सोने मागणी नोंदविणारा देश आहे.