कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला अखेर सार्वजनिक यूको बँकेने नोटीस बजाविली आहे. किंगफिशरबरोबरच मल्या यांच्या मालकीच्या युनायटेड बेव्हरेजेसलाही कर्जबुडवे का जाहीर करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पाठविली आहे.
किंगफिशरला कर्जबुडवे जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत बँकेने गेल्याच आठवडय़ात दिले होते. त्यानुसारच ही नोटीस पाठविल्याचे बँक सूत्रांनी सांगितले. कर्जाच्या बदल्यात मल्या यांनी कंपनी हमी दिली होती, असेही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मल्या यांना यापूर्वी अशी नोटीस युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक यांनीही पाठविली आहे. तर यूको बँकेचे कंपनीकडे ३०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.