किंगफिशर एअरलाइन्सला कर्जबुडवे (विलफुल डिफॉल्टर) म्हणून जाहीर करण्यासाठी आणखी एक बँक तयारी करत आहे. याबाबत नोटीस पाठविण्याची पडताळणी करत असल्याचे यूको बँकेने म्हटले आहे.
यूको बँकेने किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाची रक्कम ४०० कोटी रुपये असल्याचे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण कौल यांनी कोलकात्यात सांगितले. ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) बँकिंग विषयावरील परिषदेस उपस्थित असलेल्या कौल यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
उड्डाणे बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्स व तिचे मालक विजय मल्या यांना यापूर्वी युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक व स्टेट बँकेने कर्जबुडवे जाहीर करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पहिले पाऊल युनायटेड बँक ऑफ इंडियाने सर्वप्रथम टाकले.