माणसाने पैसा कशात गुंतविला यावरून त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचाही ओळख होत असते, असे ८४ वर्षीय ‘मार्केट गुरू’वॉरेन बफे यांचे मार्मिक विधान आहे. तथापि महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंबातील शेअर गुंतवणूक मात्र त्यांच्या एक घाव दोन तुकडे या चिरपरिचित व्यक्तित्वाच्या नेमकी उलटी असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांची मराठीजनांत ‘सट्टाबाजार’ म्हणून हिणवल्या गेलेल्या शेअर बाजारात मोठी गुंतवणूक आहे, पण गुंतवणुकीसाठी निवडलेली कंपनी जशी अपरिचित तशीच या गुंतवणुकीला फायद्याचा पाझर फुटेल या शक्यतेला वावही दिसेनासा आहे. 
मुंबईत पार्ले येथे कार्यालय असलेल्या शेअर गुंतवणूक सल्लागार कंपनी सीएनआय रिसर्च लिमिटेड या कंपनीचे रश्मी आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे प्रत्येकी २५ लाख शेअर्स आहेत. या कंपनीने मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) गुरुवारी दिलेल्या विवरणात, प्रत्येकी १ रु. दर्शनी मूल्याच्या परिवर्तनीय रोख्यांच्या बदल्यात हे शेअर्स त्यांना अधिक १ रुपयांच्या अधिमूल्याने दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजे दोघांचे मिळून कंपनीत ५० लाख शेअर्स म्हणजे कंपनीचा ८.०४ टक्के भांडवली हिस्सा अशी लक्षणीय गुंतवणूक होते. उल्लेखनीय म्हणजे प्रवर्तकांखालोखाल कंपनीतील १६ बडय़ा वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये या दोन ठाकरेंव्यतिरिक्त सारे अमराठी आहेत.  
केवळ बीएसईवर सूचिबद्ध फुटकळ शेअर्सच्या ‘टी’ वायदा गटात मोडणाऱ्या सीएनआय रिसर्च या कंपनीच्या शेअर्सच्या गुरुवारच्या ३.७० रुपये बाजारभावाप्रमाणे, ठाकरे यांच्या १ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ताजे मूल्य १.८५ कोटी असे भरते. किशोर ओस्तवाल यांनी प्रवर्तित केलेल्या सीएनआय रिसर्च या कंपनीच्या वेबस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत महसुली उलाढाल फारशी केलेली नसून, नफाही जेमतेम कमावला आहे. त्यामुळे सध्या बाजार उधाणाला असल्याने सर्वदूर तेजीची मात्रा या शेअरच्या वाटय़ाला आली इतकेच, अन्यथा यापेक्षा अधिक भाव त्याला मिळणे दुरापास्तच!
शास्त्रीय मूल्यांकनाने नापास गुंतवणूक
सीएनआय रिसर्च या कंपनीचा शेअर गुरुवारी (२४ जुलै) १.८६ टक्के घसरणीसह ३.७० रुपयांवर बंद झाला. मोदी लाटेतून आलेल्या तेजीपायी जुलै महिन्याच्या प्रारंभी या १ रु. दर्शनी मूल्य असलेल्या शेअरच्या भावाने ४.४१ रु. असा वर्षांतील उच्चांक दाखविला होता. अन्यथा सहा महिन्यांपूर्वीपर्यंत या शेअरच्या भावाला १ रुपयाचे दर्शनी मूल्यही दुर्लभ होते. कंपनीची वित्तीय कामगिरी यथातथा असल्याने प्रति समभाग मिळकत ०.०३ रुपये आणि त्यानुरूप किंमत/ उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) तब्बल १२३.३३ पट असे महागडे आहे. तात्पर्य, गुंतवणुकीसाठी शेअर निवडीच्या मूलभूत निकषांवर सीएनआय रिसर्च पूर्णपणे नापास ठरतो. पण गुंतवणुकीला ठाकरे वलय लाभल्याने भाव वधारला तरच..