उपग्रहाच्या माध्यमातून डिजिटल सिनेमा वितरण क्षेत्रातील अग्रेसर नाव असलेल्या यूएफओ मूव्हीज इंडिया लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश प्रस्तावित केला असून, कंपनीच्या समभागांची खुली विक्री येत्या २८ ते ३० एप्रिलदरम्यान सुरू राहील. या बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या भागविक्रीत, १० रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी ६१५ रु. ते ६२५ रु. या किंमत पट्टय़ादरम्यान बोली लावता येणार आहे.
संजय गायकवाड, नरेंद्र हेटे, व्हॅल्यूएबल मीडिया लि, व्हॅल्यूएबल टेक्नॉलॉजीज लि. वगैरेंनी प्रवर्तित केलेल्या या कंपनीच्या भागविक्रीतून ६०० कोटींचा निधी उभारला जाणे अपेक्षित असून, या संपूर्ण रकमेचा विनियोग ३आय रिसर्च, पी ५ एशिया होल्डिंग इन्व्हेस्टमेंट्स या गुंतवणूकदारांसह कंपनीतील भागधारकांचा हिस्सा सौम्य करून, अधिमूल्यासह त्यांच्या निर्गमनासाठी वापरात येणार आहे.
यूएफओ मूव्हीज् ही भारतातील डिजिटल सिनेमा वितरणातील सर्वात मोठी कंपनी असून, देशभरात ४,९११ स्क्रीन्स आणि देशाबाहेर आणखी १,७१५ स्क्रीन्सवर तिच्या माध्यमातून चित्रपटांचे प्रक्षेपण होते. सिनेमा वितरणाव्यतिरिक्त, चित्रपटाच्यादरम्यान जाहिरातींच्या प्रसारणातून कंपनीला महसूल प्राप्त होतो, ज्याचा एकूण उत्पन्नात २५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, अशी माहिती कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक कपिल अगरवाल यांनी दिली. या माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींसाठी फेब्रुवारी २०१५ अखेर कंपनीने १,६६९ जाहिरातदारांना आकर्षित केले असून, वर्षांगणिक त्यात निरंतर वाढ होत आहे. भागविक्रीचा ३५ टक्के हिस्सा छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांसाठी राखीव असून, त्यांना २४ समभाग व त्यापुढे त्याच पटीत समभागांच्या खरेदीसाठी अर्ज दाखल करता येईल.