विविध कारणे देत यापूर्वी नजीकच्या व्यवसाय भविष्यावरील कमकुवत संकेत देणाऱ्या ‘इन्फोसिस’ या देशातील दुसऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने यंदा आशादायक वातावरण निर्मिती केली आहे. निव्वळ नफा आणि विक्री तसेच महसुल याबाबत तिसऱ्या तिमाहीत फारशी उल्लेखनीय कामगिरी बजाविली नसली तरी कंपनीने मार्च २०१३ पर्यंत विक्रीतील ३% वाढ राखली जाईल, असे आश्वस्त विधान केल्याने गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले आहे.
‘जानेवारी ते मार्च या चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील व्यवसायाबाबत आम्ही आशादायी आहोत. अधिक मोठय़ा व्यवहारांच्या माध्यमातून आम्ही विश्वास संपादत राहू,’ असे कंपनीच्या प्रमुखाने वचन देण्यापूर्वीच कंपनीचा समभागही ‘सेन्सेक्स’च्या दफ्तरी १७% पर्यंत उंचावला.
व्यवसायाच्या आगामी वृद्धीबद्दल आश्वासक उद्गार काढणाऱ्या कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कंपनी कर्मचारी भरती, वेतनवाढ तसेच अतिरिक्त भत्ते याबाबतही पाऊल उचलत असल्याचे सांगितले. इन्फोसिसने गेल्या वेळी शैक्षणिक पातत्रेत यशस्वी व मुलाखतीत उत्तीर्ण असणाऱ्या काही उमेदवारांना तूर्त थांबण्याचा सल्ला दिला होता.
ऑक्टोबर ते डिसेंबर या चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीत इन्फोसिसने २,३६९ कोटी रुपयांचा नफा कमाविला आहे. तो वार्षिक तुलनेत २,३७२ कोटी रुपयांपेक्षा कमी असला तरी कंपनीने नजीकच्या कालावधीतील विक्रीतील उंची ३ टक्क्यांनी अधिक गाठण्याचे जाहीर केल्याने आशावाद वाढला आहे. यानुसार कंपनीला ४०,७४६ कोटी रुपयांच्या विक्रीची आशा आहे.
डॉलरमधील ७.४५ अब्ज रकमेच्या एकूण विक्रीपैकी १०.४ कोटी डॉलरचा अतिरिक्त महसुल कंपनीला स्वित्र्झलॅन्डस्थित कंपनीमार्फत मिळणार आहे. त्याचबरोबर युरोपातील १२ व्यवहारांमार्फतही व्यवसाय वृद्धीची कंपनीला आशा आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १२ टक्के अधिक महसूल तर ५३ अधिक ग्राहक जोडले आहेत.  
तिकडे मुंबई शेअर बाजारातही कंपनीच्या समभागाची कामगिरीच उल्लेखनीय ठरली. २,७१२.१० रुपयांवर गेलेला इन्फोसिसच्या समभागाने टक्केवारीतील सर्वाधिक वाढीची राष्ट्रीय शेअर बाजारावर नोंद केली. एकूणच माहिती तंत्रज्ञान समभागांच्या जोरावरच दिवसभरात ‘सेन्सेक्स’ही १७५ अंशांनी झेपावला. सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा हे चित्र होते. यानंतर मात्र गुंतवणूकदारांनी चिंताजनक औद्योगिक उत्पादन दरावर प्रतिक्रिया दिली. परिणामी, दोन्ही प्रमुख बाजार काहीशा स्थिर अशा वातावरणातच बंद झाले. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २६ समभाग घसरणीच्या यादीत होते. विशेष म्हणजे २०१२ मध्ये इन्फोसिसचा समभाग १६.२ टक्क्यांनी घसरला आहे.
बाजाराकडून दखल; मात्र ‘इन्फी’चीच..
शून्याखालील औद्योगिक उत्पादन दर, सलग चौथ्या महिन्यात घसरलेली निर्यात असे चित्र असताना देशातील प्रमुख भांडवली बाजारांनी व्यवहारात मोठी हालचाल नोंदविली. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’सह ‘निफ्टी’ दखल न घेण्याच्या पातळीवर बंद झाले असले तरी एकूण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह या श्रेणीतील अनेक समभागांनीही शुक्रवारी चमकदार कामगिरी बजाविली.
तमाम उद्योग क्षेत्रासह गुंतवणूकदारांना प्रतिक्षा असलेल्या इन्फोसिसचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी भांडवली बाजाराच्या व्यवहारानंतर जाहीर करण्यात आले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबुलाल यांनी ते बंगळुरु मुख्यालयी सादर केले असले तरी त्याची चुणूक मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारावर सकाळपासूनच दिसत होती.