भांडवली बाजारपेठेत ऊर्जितावस्था आणण्यासाठी  सरकारने गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्पात काही उपाययोजना जाहीर केल्या तसेच काही करसवलती जाहीर केल्या, त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४३४ अंकांनी वाढला. परंतु दिवसाखेर तो ७२ अंशांनी कोसळला. त्यामुळे उसळी क्षणिक ठरली. परदेशी गुंतवणूकदार व कंपन्यांच्या बंधपत्रावरील शिथिल केलेली नियंत्रणे व भारत डिपॉझिटरी रिसीप्ट्सची नव्याने निर्मिती या निर्णयांमुळे बाजार वधारण्यास मदत झाली. मुंबई शेअर बाजार २३३७२.७५ अंकांवर बंद झाला, सुरुवातीपेक्षा तो ७२ अंकांनी कमी झाला, गुंतवणूकदारांचा वाढलेला उत्साह, चलनवाढ आटोक्यात आणणे व आर्थिक वाढ साधण्याचे आश्वासन यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वर गेला होता
नो युवर कस्टमर म्हणजे केवायसी निकष सगळीकडे सारखे असले पाहिजेत व एकाच डिमॅट अकाउंटवर ग्राहक व्यवहार करू शकतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्याचाही सकारात्मक परिणाम झाला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारत डिपॉझिटरी रिसीप्टसची घोषणा केली, त्यामुळे या एकूणच व्यवस्थेची फेररचना करण्यात आली आहे. यापूर्वी अमेरिकन डिपॉझिटरी रिसीप्ट व ग्लोबल डिपॉझिटरी रिसीप्ट असे दोनच प्रकार होते. भारतीय कंपन्यांनी परदेशात जारी केलेल्या बंधपत्रावर पाच टक्के ‘विथहोल्ड’ कराची सुविधा दिली आहे.