यंदाच्या अर्थसंकल्पात दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सुधारणावादी, सकारात्मक, व्यावहारिक गोष्टींचे योग्य भान असलेला म्हणावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. यामध्ये शेतकरी, युवा पिढी, गरीब आणि मध्यमवर्गीय जनता या समाजातील सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेही मोदींनी सांगितले. त्यामुळे हा अर्थसंकल्प विकास, समता आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा ठरेल, असा आशावाद मोदींनी ट्विटरवर व्यक्त केला. गुंतवणूकदरांचे हित साधणाऱ्या या अर्थसंकल्पात करदात्यांच्याही सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. याबद्दल मी जेटली यांचे अभिनंदन करतो. त्यांनी देशातील विविध राज्यांच्या अपेक्षा आणि राष्ट्रीय प्राधान्याच्या मुद्द्यांना योग्य न्याय दिल्याचे मोदींनी म्हटले आहे. समाजातील सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी वेगळा आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार असून, हा अर्थसंकल्प भरभरटीच्या भविष्याची नांदी ठरेल, असे मोदींनी सांगितले.