वरच्या टप्प्यावर प्रवास करणाऱ्या भांडवली बाजारामुळे गुंतवणूकदारांबरोबर कंपन्यांचाही उत्साह दुणावला असून त्यांनी या मार्फत निधी उभारणीसाठी घाई केल्याचे चित्र आहे. म्युच्युअल फंडांच्याही अनेक नवीन योजना वाटेवर आहेत.

मुंबई शेअर बाजार बुधवारी ३० हजारांपल्याड पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ९,१०० हजारानजीक जात नवीन विक्रम स्थापित केला. निफ्टी सलग दुसऱ्या व्यवहारात ऐतहासिक विक्रमावर विराजमान झाला.
बाजारात असे चित्र असताना जवळपास तीन डझन म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या नव्या निधी योजना (एनएफओ) घेऊन येण्याचा मनोदय सेबी या भांडवली बाजार नियामकाकडे व्यक्त केला आहे. याबाबतची कागदपत्रेही सादर करण्यात आली आहे. त्यानुसार नजीकच्या कालावधीत भांडवली बाजाराच्या माध्यमातून या योजना सादर करून गाठीशी अतिरिक्त रक्कम बांधण्यांचा त्यांचा इरादा आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यातच या कंपन्या भांडवली बाजार दफ्तरी धडकताना दिसतील.
सेबीच्या आवश्यक मंजुरीनंतर लगेचच वर्षभराच्या आत अशा योजना घेऊन येण्याचे या ३४ म्युच्युअल फंड कंपन्यांना वाटते. यासाठी सेबीकडे आपला विचार मांडणाऱ्यांपैकी १९ कंपन्यांनी आपल्या योजना गेल्याच महिन्यात, तर १३ कंपन्यांनी जानेवारीमध्ये आपला प्रस्ताव दिला आहे. पैकी अनेकांनी योजना सादरही केल्या आहेत.
तर नव्या रुपात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, रिलायन्स, एसबीआय, यूटीआय, एचडीएफसी या म्युच्युअल फंड कंपन्यांनी रस दाखविला आहे. समभाग तसेच समभागाशी निगडित रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या योजना सादर करण्याचा त्यांचा मानस आहे. तर अनेक फंड घराण्यांनी इ-कॉमर्ससारख्या नव्या दमाच्या क्षेत्रात उत्सुकता दाखविली आहे. यामाध्यमातून वधारत्या भांडवली बाजाराचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.