गव्‍‌र्हनर ऊर्जित पटेल यांचे प्रतिपादन; नोटाबंदीचा फायदा तात्काळ नाही

निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिणामांना सामोरे जाण्यास रिझव्‍‌र्ह बँक तयार आहे. येत्या काही दिवसांमध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सांगितले.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पटेल यांनी १०० दिवस उलटल्याच्या पाश्र्वभूमीवर सद्य:स्थितीचा आढावा घेतला. नोटाबंदीमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व चलनटंचाई सध्या काही प्रमाणात दूर झाली असून, अनेक स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती सामान्य करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यातून गतीने बाहेर पडण्यात यश आले आहे. आम्ही आमचे काम केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेसह संपूर्ण बँकिंग व्यवस्थेने महाकाय कामगिरी पार पाडली असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे इंग्रजीतील ‘व्ही’ अक्षराप्रमाणे अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडणार असून, थोडय़ा वेळासाठी यामध्ये कमी वाढ दिसून येईल. त्यानंतर यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मोठी वाढ झाल्याचे आपल्याला दिसेल, असे पटेल यांनी नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर कोणत्या प्रकारे प्रभाव पडेल, या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.  माघारी घेण्यात आलेल्या नोटांच्या जागी नव्या नोटा देण्याचे काम गतीने सुरू आहे. मागील महिन्यांमध्ये उच्च स्तरावर नोटाछपाईचे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेने मागील वर्षांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांमध्ये विकास दर ७.१ टक्क्यांवरून कमी करीत तो ६.९ टक्के केला आहे. मात्र वर्ष २०१७-१८ मध्ये हा विकास दर पुन्हा ७.४ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पायाभूत क्षेत्रात विकासाची गरज – पटेल

८६ टक्के जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याचा फायदा दिसण्यासाठी वेळ लागणार असून, मिळणाऱ्या फायद्यासाठी अजून मोठय़ा प्रमाणात कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पायाभूत सुविधा, कामगार आणि जमीन या क्षेत्रातील विकासामुळे विकास दरामध्ये वाढ होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.