व्यापारविषयक धोरणांबाबत जागतिक व्यापार संघटनेच्या प्रस्तावांना विरोध करणाऱ्या भारताने एकदा पुनर्विचार करावा, असे आवाहन करतानाच भारत भेटीदरम्यान या विषयावर तोडगा निघण्याची अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
जागतिक व्यापाराची सुलभता स्पष्ट करणाऱ्या ‘ट्रेड फॅसिलिटेशन’ कराराला (टीएफए) भारताने विरोध करत जागतिक व्यापार संघटनेला हादरा दिला आहे. अन्नसुरक्षेसाठीच्या धान्यसाठय़ाबाबत कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत अशा करारावर स्वाक्षरी केली जाणार नाही, अशी भूमिका भारताच्या वतीने घेण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्षात अमेरिका, ब्रिटन आदींचा विरोध भारताने ओढवून घेतला आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री पेनी प्रिज्झकेर या सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबईत त्यांनी ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) प्रतिनिधींशी चर्चा केली. या वेळी डिसेंबर २०१३ मध्ये बाली येथील जागतिक व्यापार परिषदेत झालेल्या करारापासून भारत आता माघार घेत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आपण गुरुवारी नवी दिल्लीतही जात असून केंद्र सरकारबरोबर या विषयावर चर्चा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
वाणिज्य मंत्री म्हणून प्रथमच भारत दौऱ्यावर येणाऱ्या पेनी या करारविषयक गंभीर विषयाबरोबरच भारत आणि अमेरिका यांच्यातील अन्य व्यापार संबंधावरही या वेळी चर्चा करणार आहेत. पेनी यांच्याबरोबरच अमेरिकेचे राज्यमंत्री जॉन केरी हेही या वेळी उपस्थित असतील. जागतिक व्यापारातील आपली नेमकी भूमिका भारताने विशद करावी, अशी अपेक्षा केरी यांनीही व्यक्त केली आहे. केरी हेदेखील भारताच्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबरील चर्चेत सहभागी होणार आहेत.